Varsha Gaikwad : नवनिर्वाचित खासदार वर्ष गायकवाड यांचा विधानसभेचा राजीनामा

•धारावी विधानसभेच्या आमदार Varsha Gaikwad यांनी आमदारकीचा केलेला राजीनामा..
मुंबई :- मुंबई उत्तर मध्याच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वर्षा गायकवाड गेल्या चार वेळेपासून धारावीच्या आमदार म्हणून निवडून आले आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार जेष्ठ वकील उज्वल निकम असे सामना रंगला होता. शेवटच्या काही तासात वर्षा गायकवाड यांचा अतिशय रोमांचित पद्धतीने विजय झाला त्यांच्या या विजयानंतर त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा देणे बंधनकारक आहे त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीना सोपवत वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
वर्षा गायकवाड यांनी धारावीकरांचे मानले आभार..
आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. ज्या धारावीतून मी ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले, ते पद मला आज आयुष्याच्या एका नव्या वाटेवर पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सोडावे लागत आहे. आज संसदेच्या सदस्यत्वाच्या नियमांचे पालन करून मी धारावीच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे.
पण आज मी जी काही आहे, ती याच धारावीमुळे! माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला धारावीनेच आपला स्नेहभाव आणि पाठबळ देऊन आज या यशाच्या शिखरावर आणून बसवले आहे. धारावी हा माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नसून माझा परिवार आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब माझ्या धारावी परिवाराशी कायमच जोडलेले राहू, यात काही शंका नाही.
गायकवाड कुटुंबाला धारावीने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब यापुढेही फेडत राहील हे मी आवर्जून सांगू इच्छिते. धारावी आपल्या सर्वांची आहे, ती कोणाच्याही स्वार्थापुढे झुकू देणार नाही. धारावीकरांच्या हक्काच्या या लढ्यात मी आणि माझे कुटुंब नेहमीच सहभागी होतो, आहोत आणि राहणार. आपण सर्वजण एकजुटीने लढू आणि नक्कीच जिंकू.
मला सदैव भक्कम साथ आणि पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या धारावी कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते. तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि गायकवाड कुटुंबियांवर कायम राहतील, असा विश्वास आहे.कृतज्ञ..!