International Women’s Day : आंतरराष्ट्रीय महिला दिन!

International Women’s Day 2025 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून का साजरा केला जातो
मुंबई :- महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून हा दिवस पाळला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो.सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळीमुळे उत्तेजित असणारा हा दिवस पळ 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला.
28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यू यॉर्क शहरातील सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने आयोजित केलेला “महिला दिन” हा सर्वात पहिला दिवस होता. यामुळे 1910 च्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत जर्मन प्रतिनिधींना “एक विशेष महिला दिन” दरवर्षी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास प्रेरित केले, पण यावेळी कोणतीही निश्चित तारीख ठरली नाही; पुढील वर्षी संपूर्ण युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे साजरा झाल. 1917 मध्ये रशियन क्रांतीनंतर 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय सुट्टी देण्यात आली; त्यानंतर समाजवादी चळवळ आणि कम्युनिस्ट देशांनी त्या तारखेला तो दिवस साजरा केला. 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात जागतिक स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार होईपर्यंत ही सुट्टी डाव्या चळवळी आणि सरकारांशी संबंधित होती.1977 मध्ये संयुक्त राष्ट्राने केलेल्या जाहिरातीनंतर जागतिक महिला दिन ही मुख्य प्रवाहातील जागतिक सुट्टी बनली.
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा
जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका,
कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले.