मुंबई

Raj Thackeray : “मतदार यादी गोपनीय की मतदान?” राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आसूड; अजित पवारांची मिमिक्री करत टोला

• मविआ, मनसे आणि इतर विरोधी पक्षांचे एकत्रित शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आक्रमक

मुंबई :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजाविरोधात आज (15 ऑक्टोबर) तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन दिवसांच्या चर्चेनंतरही समाधान न झाल्याने महाविकास आघाडीसह मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज वाय.बी.चव्हाण सेंटर येथे एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आयोगावर गंभीर आरोप केले.

या शिष्टमंडळात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील (राकाँ), जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, अनिल परब, अनिल देसाई यांच्यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते.

“यादी गोपनीय की मतदान?” राज ठाकरेंचा थेट सवाल

पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट प्रश्न विचारत त्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, “निवडणूक आयोग फक्त निवडणूक घेतो, पण लढवतात राजकीय पक्ष. मात्र, राजकीय पक्षांना निवडणूक आयोग याद्या दाखवत नसेल, तर याचा अर्थ इथे घोळ आहे.”

राज ठाकरेंनी आयोगाच्या भूमिकेवर अधिक कठोर टीका करताना विचारले, “मतदार यादी गोपनीय असते की मतदान गोपनीय असतं? सीसीटीव्ही आहेत, तर ते (आयोग) हे बघू शकतात…मग आम्ही का नाही?” त्यांनी 2017 मधील जिल्हा परिषदेच्या याद्यांमध्ये फोटो होते, पण आताच्या याद्यांमध्ये फोटो आणि पत्ता नाही, या त्रुटीकडे लक्ष वेधले.

“आणखी 6 महिने नाही झाल्या तर काय फरक पडतो?”

मतदार याद्यांतील घोळ सुधारल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी राज ठाकरे यांनी पुनरुच्चारित केली. त्यांनी प्रशासनाला जाब विचारला, “पाच वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, आणखी 6 महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो? याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका.”

युतीवर प्रश्न आणि अजित पवारांची मिमिक्री

‘तुम्ही आजकाल महाविकास आघाडीसोबत दिसता,’ या पत्रकारांच्या शेवटच्या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी मिश्किलपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री (नक्कल) केली.

राज ठाकरे म्हणाले, “मला वाटतं मी 2017 ला देखील दिसलो होतो. आता निवडणूक होणार, कशी होणार, हे महत्त्वाचं आहे, ती कोणासोबत होणार ते महत्त्वाचं नाही.” 2017 च्या पत्रकार परिषदेची आठवण करून देत ते म्हणाले, “त्यावेळी अजित पवार देखील होते. त्यावेळी ते तावातावाने बोलत होते. त्यावेळी ते सगळ्या गोष्टी सांगत पण होते.”

राज ठाकरे यांनी आयोगाला इशारा दिला की, उद्या-परवामध्ये ते काय निर्णय घेतात, हे पाहू. त्यानंतर आम्ही सर्व विरोधी पक्ष आमचा निर्णय सांगू. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयावर आणि विरोधी पक्षाच्या संयुक्त भूमिकेवर महाराष्ट्राचे राजकारण तापणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0