देश-विदेश

Delhi News : SIR विरोधात INDIA आघाडीचा दिल्लीमध्ये मोर्चा; संजय राऊतांचा आक्रमक इशारा, म्हणाले- “दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच”

Delhi News : नवी दिल्ली : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी INDIA आघाडीतील खासदारांनी आज संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, मोर्चाच्या मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत.https://maharashtramirror.com/ Delhi News
SIR प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत INDIA आघाडीतील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आयोगाच्या निर्णयांविरोधात आणि CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News


संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मोर्चापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी, “सरकार खासदारांना घाबरायला लागलं आहे. आमच्यावर दांडुके चालवा, बंदुका रोखा; आम्ही निवडणूक आयोगावर जाणारच,” असा इशारा दिला.
SIR प्रक्रियेत कथित गैरप्रकार होत असून त्याचा फायदा भाजपला करून दिला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ INDIA आघाडीचा मोर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ज्ञानेश कुमार यांनी कोर्टाची दिशाभूल केली’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राऊत यांनी गंभीर आरोप केले. “कोर्टाची दिशाभूल ज्ञानेश कुमार यांनी केली आहे. अशा व्यक्तीला खुर्चीवर ठेवू नये,” असे ते म्हणाले.
तसेच, “जितके दिवस ते खुर्चीवर राहतील, तितके दिवस मोदी आणि शाहांचं अधःपतन सुरू राहील,” असा दावा राऊत यांनी केला.
दरम्यान, SIR आणि मतदार यादीशी संबंधित मुद्द्यांवरून निवडणूक आयोगाविरोधातील राजकीय वाद अधिक तीव्र झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातही Form 6 आणि SIR प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर सुनावणी सुरू असून, न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
‘सर्वांनी एकत्र आलं पाहिजे’
या आंदोलनात आम आदमी पक्षानेही सहभागी व्हावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. विरोधकांनी आपापले मतभेद आणि अहंकार बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
“स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली डावे आणि समाजवादी एकत्र आले होते. त्याचप्रमाणे आताही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे,” असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यात संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात या मुद्द्यावर सर्वांशी चर्चा केली जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा
INDIA आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले असून, पोलिस आणि निमलष्करी दलाची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
मोर्चाला परवानगी आणि आंदोलकांच्या हालचालींबाबत दिल्ली पोलिसांकडून निर्बंध लागू असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे INDIA आघाडीचा हा मोर्चा कोणत्या टप्प्यावर पोहोचतो आणि त्यानंतर राजकीय वातावरण कसे बदलते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button