मुंबई

Sanjay Shirsat : “येत्या 3 महिन्यांत राजकारणात मोठा भूकंप होणार”; मंत्री संजय शिरसाट यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

•”एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हीच सर्वांची इच्छा; भाजप-शिंदे सेनेतील वाक्युद्धादरम्यान मंत्र्यांच्या विधानामुळे चर्चांना उधाण.”

मुंबई :- राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील मतभेद आणि वाद चव्हाट्यावर आले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी सुरू असल्याने महायुतीत सर्व काही ठीक नसल्याची चर्चा रंगली आहे. अशातच शिंदेसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना आगामी 3 ते 4 महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये कोणताही वाद किंवा धुसफूस नसली, तरी मित्रपक्षांच्या नेत्यांनी पातळी सोडून टीका करू नये, असा इशाराही शिरसाट यांनी दिला. मात्र, याचवेळी आगामी काळात एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी बरीच चर्चा सुरू असून एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे नेते (‘कॉमन मॅन’) असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

आगामी काळ शिवसेनेचाच असणार; आमदार संतोष बांगर यांचीही प्रतिक्रिया

संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनीही प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही प्रत्येक शिवसैनिकाची मनापासून इच्छा असल्याचे म्हटले आहे. आगामी वर्ष हे पूर्णपणे शिवसेनेचे असेल असा विश्वासही नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या अलीकडील गुप्त भेटीबाबत बोलताना शिरसाट यांनी, नेते सांस्कृतिक किंवा वैयक्तिक कार्यक्रमांत भेटत असतात, त्यामुळे लगेच नवीन राजकीय समीकरणे उदयाला येतात असे म्हणणे चुकीचे ठरेल, अशी सावध प्रतिक्रिया दिली. मात्र, संजय शिरसाट यांच्या 3 महिन्यांतील मोठ्या बदलांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळातील उत्सुकता आणि ताण दोन्ही वाढले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button