Mumbai Rain Update : मुंबईत महिन्याभराच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाची अचानक हजेरी; दादर परिसरात सरी बरसल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा

•ऑक्टोबर हिटच्या चटक्यांमुळे मुंबईकर त्रस्त असतानाच सकाळीच पावसाचे आगमन; कामावर जाणाऱ्यांची उडाली तारांबळ.
मुंबई :- राज्यातील विविध भागांत पावसाने यापूर्वीच काढता पाय घेतला असून, पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे अनेक ठिकाणी शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके करपल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशातच दुसरीकडे मुंबईकरांना मागील महिन्यापासून ‘ऑक्टोबर हिट’चे तीव्र चटके सहन करावे लागत होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचा पारा थेट 35 अंशाच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता, ज्यामुळे नागरिक प्रचंड उकाड्याने हैराण झाले होते.
अशा बिकट वातावरणात मुंबईतील दादर आणि परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. महिन्याभराच्या मोठ्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे अचानक हवेत गारवा निर्माण झाला.
सकाळच्या सत्रात नागरिकांची उडाली तारांबळ; हवेत निर्माण झाला गारवा
सकाळच्या सुमारास अचानक दादर परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे ऑफिस गाठणाऱ्या नोकरदार वर्गाची तसेच मॉर्निंग वॉक आणि जॉगिंगसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. अनेक जण आडोसा शोधताना दिसले, तर काहींनी या अचानक आलेल्या पावसाचा आनंदही लुटला.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना या छोट्याशा पावसामुळे तात्पुरता का होईना, पण मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काळात हवामानात आणखी काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


