मुंबई

Mumbai Crime News : पोलिसांच्या नावाने अटकेची भीती दाखवून वृद्धेची 1 कोटी 55 लाखांची फसवणूक; उत्तर विभाग सायबर पोलिसांकडून चेंबूरमधून दोघांना अटक

•मालाडमधील 88 वर्षीय निवृत्त महिलेला डिजिटल अरेस्टचे आमिष दाखवून लुटले; कमिशनसाठी बँक खाती पुरवणाऱ्या दोन तरुणांना बेड्या, बोरिवली न्यायालयाकडून पोलीस कोठडी

मुंबई :- मालाड पश्चिम परिसरात राहणाऱ्या एका 88 वर्षीय निवृत्त महिलेची पोलिसांच्या नावाने बनाव करून तब्बल 1 कोटी 55 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. 7 एप्रिल 2026 रोजी एका भामट्याने महिलेला फोन करून आपण नाशिकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. महिलेच्या क्रमांकाचा गैरवापर आर्थिक गैरव्यवहारासाठी झाल्याचे सांगून तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट नोटिसा पाठवून तिचा विश्वास संपादन केला आणि तपास पूर्ण होईपर्यंत रक्कम सुरक्षित खात्यात जमा करण्यास सांगून टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली.

बहिणीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला प्रकार

अटकेच्या व कारवाईच्या भीतीने घाबरलेल्या त्या वृद्धेने 7 ते 25 एप्रिलदरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आपली आयुष्यभराची पुंजी हस्तांतरित केली. मात्र, पैसे परत न मिळाल्याने आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार आपल्या बहिणीला सांगितला. वृत्तपत्रात ‘डिजिटल अटक’ फसवणुकीविषयीची बातमी वाचल्यानंतर बहिणीने त्यांना तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला, ज्यानंतर उत्तर विभाग सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली.

तांत्रिक तपासाच्या आधारे चेंबूरमधून आरोपींना अटक

गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी फसवणुकीची रक्कम वळती झालेल्या बँक खात्यांची पडताळणी केली. यामध्ये यश योगेश चौहान (वय 20) याच्या खात्यात 5 लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी यश चौहान आणि त्याचा साथीदार समीर बाळू भोसले (वय 21) या दोघांना चेंबूरमधील रमाबाई आंबेडकर नगर परिसरातून जेरबंद केले. हे दोन्ही तरुण कमिशनच्या बदल्यात स्वतःची आणि नवीन बँक खाती सायबर भामट्यांना उपलब्ध करून देत होते. बोरिवली न्यायालयाने दोघांनाही पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावली असून, या रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button