BMC 2026 Bonus : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; यंदा मिळणार 32 हजार रुपयांचा सानुग्रह बोनस

•महापौरांच्या अधिकृत घोषणेआधीच ‘सॅप’ प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना कळाली बोनसची रक्कम; कामगार संघटना व सत्ताधाऱ्यांची मध्यस्थी ठरली दुय्यम
मुंबई :- आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सुमारे 90 हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी आनंदाची ठरणार आहे. मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना यंदा 32 हजार रुपये दिवाळी बोनस (सानुग्रह अनुदान) मिळणार असल्याचे उघड झाले आहे. गतवर्षाच्या 31 हजार रुपयांच्या तुलनेत यंदा बोनसच्या रकमेत 1 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या बोनसच्या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे 300 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.
‘सॅप’ प्रणालीमुळे ऐनवेळचे सस्पेन्स संपले; कामगारांना आधीच समजली रक्कम
दरवर्षी दिवाळीच्या काळात महापालिकेत कामगार संघटनांकडून 50 ते 60 हजार रुपयांच्या बोनसची मागणी केली जाते. त्यानंतर प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये बैठकांचा फेरा सुरू होऊन सत्ताधाऱ्यांच्या मध्यस्थीने बोनसची रक्कम नाट्यमयरित्या जाहीर करण्याची परंपरा राहिली आहे. मात्र, यंदा बुधवारी दुपारी 1 वाजता महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनांची औपचारिक बैठक होण्याआधीच मंगळवारीच ‘सॅप’ (SAP) प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या 32 हजार रुपयांच्या बोनसची माहिती मिळाली. यामुळे महापौरांच्या बैठकीची आणि घोषणेची उत्सुकता पूर्णपणे मावळली आहे.
संघटना आणि सत्ताधाऱ्यांचे महत्त्व कमी झाल्याची पालिका वर्तुळात चर्चा
महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस कायदा 1972 थेट लागू होत नसल्यामुळे पालिका प्रशासन आपल्या इच्छेने सानुग्रह अनुदान मंजूर करते. यंदा विविध कामगार संघटनांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि महापौरांकडे 20 टक्के म्हणजेच 50 ते 60 हजार रुपये बोनसची जोरदार मागणी केली होती. परंतु, प्रत्यक्ष चर्चेआधीच बोनसची रक्कम प्रणालीवरून उघड झाल्यामुळे दरवर्षी होणारे संघटनांचे शक्तिप्रदर्शन आणि सत्ताधाऱ्यांच्या मध्यस्थीचे श्रेय घेण्याचे राजकारण यंदा फिस्कटले असून कामगारांमध्ये याचीच जोरदार चर्चा सुरू आहे.


