देवाची उरुळीत गार्डन वेस्ट प्रकल्पासाठी ५३ लाखांच्या खर्चास मंजुरी

रस्ते आणि पदपथांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि इतर हिरव्या कचऱ्याची स्वच्छता अधिक परिणामकारकपणे करता येणार
निलेश राऊत
पुणे: देवाची उरुळी येथे गार्डन वेस्ट प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक स्थापत्य दुरुस्तीच्या कामास महापालिकेने मंजुरी दिली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या कामासाठी ५३ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असून, संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

या कामासाठी मे. पूजा कन्स्ट्रक्शन, हडपसर या कंपनीची निवड करण्यात आली आहे. कंपनीने ४५ लाख २४ हजार रुपयांची निविदा सादर केली असून, ती अंदाजपत्रकाच्या तुलनेत ३३.१५ टक्के कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जीएसटी, मटेरिअल टेस्टिंग शुल्क आणि अन्य आकारांसह एकूण खर्च ५३ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाने या कामासाठी ७९ लाख ९९ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी खातेप्रमुखांनी त्यास मान्यता दिल्यानंतर ६७ लाख ६८ हजार रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. २५ नोव्हेंबरपर्यंत निविदा स्वीकारण्यात आल्या असून, एकूण सात पात्र निविदा प्राप्त झाल्या होत्या.
महापालिकेच्या माहितीनुसार, उरुळी देवाची येथील कात्रज बायपास-सासवड रस्त्यालगतची जागा घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे. या ठिकाणी गार्डन वेस्टचे संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागातील हिरव्या कचऱ्याची प्रभावी हाताळणी होण्यास मदत होणार आहे.
रस्ते आणि पदपथांवर पडणाऱ्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा आणि इतर हिरव्या कचऱ्याची स्वच्छता अधिक परिणामकारकपणे करता येणार असून, शहर स्वच्छतेत सुधारणा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील गुणांकन वाढविण्यासाठीही या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केल्याचे भिमाले यांनी सांगितले.



