देश-विदेश

Delhi News: सत्य निकेतनमध्ये पाच मजली पीजी इमारत कोसळली बेकायदा बांधकामांवर प्रशासनाची नजर


Delhi News : नवी दिल्ली: दिल्लीतील दक्षिण-पश्चिम भागातील सत्य निकेतन परिसरात रविवारी (दि.६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाच मजली विद्यार्थी पीजी इमारत अचानक कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. ‘होस्टेल डेज’ या नावाने सुरू असलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. घटनेनंतर अग्निशमन दल, दिल्ली पोलिस, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण जखमी झाले आहेत.https://maharashtramirror.com/ Delhi News
घटना घडली त्यावेळी परिसरात मोठा आवाज झाला आणि जवळच्या इमारतींमधील रहिवासी घाबरून घराबाहेर आले. काही रहिवाशांना इमारत कोसळताना जमिनीला हादरे बसल्यासारखे जाणवले. स्थानिक रहिवासी राजेन छेत्री यांनी सांगितले की, इमारतीत सुमारे पंधरा खोल्या होत्या आणि प्रत्येक खोलीत दोन ते तीन विद्यार्थी राहत होते. दुर्घटनेपूर्वी इमारतीच्या तळघरात बांधकाम किंवा दुरुस्तीचे काम सुरू असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. तळघरातील काम, पाण्याचा साठा आणि इमारतीच्या कमकुवत पायाभरणीमुळे दुर्घटना घडली असावी, या शक्यतेचा तपास सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
अनेक जण या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तो इमारतीतून बाहेर पडताच काही क्षणांत संपूर्ण इमारत कोसळली. आणखी एका रहिवाशाने सांगितले की, त्याचा भाचा इमारत कोसळण्याच्या काही सेकंद आधी मोटारसायकलवरून तेथून बाहेर पडला होता. त्याच्या बाहेर पडताच मोठ्या आवाजासह इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे काही सेकंदांच्या फरकाने अनेकांचे जीव वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले.


रविवार असल्याने अनेक विद्यार्थी पीजीमध्ये


रविवार असल्याने अनेक विद्यार्थी महाविद्यालयात गेले नव्हते आणि पीजीमध्येच होते. स्थानिकांच्या माहितीनुसार या पीजीमध्ये केरळ, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थी राहत होते. पावसामुळेही अनेक विद्यार्थी आपल्या खोल्यांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. काही विद्यार्थी शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे घरी गेले होते. त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी इमारतीत नेमके किती विद्यार्थी होते, याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News


जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


सत्य निकेतनमधील दुर्घटनेनंतर परिसरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक जुन्या घरांचे पीजीमध्ये रूपांतर झाले असून पाच-सहा मजली इमारती आणि तळघरांचे बांधकामही करण्यात आले आहे. त्यामुळे अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून सुरक्षेची तपासणी करण्याची मागणी होत आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News
दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मोडकळीस आलेल्या इमारती, अनधिकृत बांधकामे, तळघरातील कामे आणि सुरक्षा निकषांचे पालन न करणाऱ्या पीजींची तपासणी सुरू केली आहे. शेजारील एका पीजीवरही कारवाई करून ते सील करण्यात आल्याची माहिती आहे. इमारत कोसळण्यामागे दुरुस्ती आणि बांधकामाच्या कामांचा काही संबंध आहे का, तसेच संबंधित बांधकामांना परवानगी होती का, याचा तपास केला जात आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button