Badlapur Breaking News : बदलापूर हादरले! पाचवीतील विद्यार्थिनीचा बस चालकाकडून विनयभंग; महिला मदतनीस नसल्याचा साधला फायदा

Badlapur Latest Crime News : 38 वर्षीय नराधम बस चालकाला वांगणीतून अटक | शाळा व्यवस्थापन आणि बस मालकाला पोलिसांची नोटीस | वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
बदलापूर :- गेल्या काही काळापासून शाळकरी मुलींच्या सुरक्षेवरून चर्चेत असलेल्या बदलापुरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतून घरी सोडताना एका 38 वर्षीय बस चालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. विशेष म्हणजे, ज्या वाहनांमध्ये महिला मदतनीस असणे अनिवार्य आहे, तिथे मदतनीस नसल्याचा फायदा घेत हा गैरप्रकार करण्यात आला. Badlapur Breaking News
नेमकी घटना काय?
बुधवारी शाळा सुटल्यानंतर ही विद्यार्थिनी बसने घरी जात होती. यावेळी बसमध्ये महिला मदतनीस उपस्थित नव्हती. याच संधीचा फायदा घेत चालकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करत तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने घरी पोहोचल्यावर धाडसाने हा सर्व प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी वेळ न घालवता बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांची तत्काळ कारवाई
तक्रार प्राप्त होताच सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मध्यरात्रीच गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला वांगणी येथून अटक करण्यात आली. आरोपी गेल्या 8 वर्षांपासून बस चालक म्हणून काम करत आहे.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे
महिला मदतनीस गायब: बसची मालक असलेली महिलाच मदतनीस म्हणून काम पाहत होती. मात्र, घटनेच्या दिवशी ती प्रकृती अस्वस्थतेमुळे सुट्टीवर होती. नियमानुसार पर्यायी मदतनीस असणे गरजेचे असताना तशी सोय करण्यात आली नव्हती.
शाळा प्रशासनावर ओढले ताशेरे: विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दल पोलिसांनी शाळा व्यवस्थापन आणि बस मालकाला नोटीस बजावली असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
नियम केवळ कागदावरच?
गेल्याच महिन्यात एका खासगी व्हॅनमध्ये अशाच प्रकारची अत्याचाराची घटना घडली होती. त्यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बदलापूरचा दौरा करून कडक नियमांचे संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शाळा आणि खासगी वाहतूकदार अजूनही नियमांना केराची टोपली दाखवत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
पालकांना आवाहन
पोलीस प्रशासन आता विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन अधिक तपास करत आहे. मात्र, पालकांनीही आपल्या पाल्याची वाहतूक करणाऱ्या वाहनात सीसीटीव्ही, महिला मदतनीस आणि इतर सुरक्षा साधने आहेत का, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


