मुंबईठाणे
Trending

Devendra Fadnavis : ‘आंदोलनाला मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक विचार करू’; मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil : ‘ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न’

मुंबई :- मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुदतवाढ देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी दिले आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला केवळ एका दिवसाची परवानगी आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जरांगे पाटलांनी आंदोलनासाठी पुन्हा परवानगी मागितली आहे. उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस या परवानगीचा सकारात्मक विचार करतील.”

‘कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “आम्ही यासाठी एक उपसमिती तयार केली आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर समिती विचार करत आहे. फक्त आश्वासन देऊन चालणार नाही, तर संविधानात बसणारे कायदेशीर मार्ग कसे काढता येतील, असा सरकारचा प्रयत्न आहे.”
या आंदोलनामुळे दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊ नये, अशी सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. “ओबीसी समाजालाही सांभाळावे लागेल आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल. गेल्या दहा वर्षांत आम्ही मराठा समाजाला न्याय दिला आहे आणि त्यांच्या पाठीशी आहोत.”

‘राजकीय पोळी भाजणाऱ्यांना इशारा’

काही लोक मराठा आणि ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत फडणवीस यांनी त्यांना इशारा दिला.

“काही लोक दोन समाज एकमेकांसमोर कसे येतील, याचे प्रयत्न माझ्या लक्षात येत आहेत. त्यांना माझं सांगणं आहे की, आंदोलनावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुमचं तोंड भाजेल,” असे ते म्हणाले.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असून, ती पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button