मुंबई

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना पत्र; पत्रात तरुण पिढी बाबत चिंता

Sanjay Raut Send Letter To Deputy CM : ऑनलाइन जुगारात पिढी उद्ध्वस्त, संजय राऊत यांचे पत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून गंभीर आरोप केले

मुंबई :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. राज्यात ऑनलाईन जुगारामुळे तरुण पिढी उध्वस्त होत आहे. मात्र राज्यातील गृहमंत्री काय करत आहेत? असा खडा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच सरकारला काही देणेघेणे नसून या जुगार अड्ड्यांकडून सरकारला हफ्ता येतो असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

संजय राऊत Sanjay Raut यांनी ड्रग्ज आणि ऑनलाईन जुगारावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “राज्यात सातत्याने उघडपणे गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आमदार गोळीबार करतात, हत्या, लुटमारीच्या घटना घडत आहेत. गुजरातमधून नाशिक, पुणे आणि मुंबईत हजारो कोटींचे ड्रग्ज येत आहेत. मात्र हे सरकार काय करतंय? गृहगमंत्री काय करतायेत?”, असे राऊत म्हणाले.आता नवीन माहिती अशी आहे की ऑनलाईन जुगाराच्या आहारी तरुण पिढी जात आहे. त्यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. ज्याप्रमाणे कुटुंब उध्वस्त होत होते म्हणून आर. आर पाटील यांनी लेडीज बार बंद केले. त्याचप्रमाणे ऑनलाईन जुगारमध्ये राज्यातील तरुण पिढी उध्वस्त होत आहे. मात्र सरकारला त्याचे देणेघेणे नाही कारण याच जुगार अड्ड्यांकडून सरकारला हफ्ता येतो. आता फडणवीस यांनी हे फेटाळले तर मी त्यांना पुरावे देईन”, असेही राऊत स्पष्टपणे म्हणाले.

संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले पत्र जशास तसे…

मा. श्री. देवेंद्रजी,

विषय – महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे चालू असलेल्या जुगाराबाबत.

महोदय,प्रिय देवेंद्रजी, राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशनात घुसून गोळीबार करीत आहेत, तर कुठे लोकप्रतिनिधींवर गोळ्या चालवून हत्या घडवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच मुंबईसह महाराष्ट्रात ‘ऑनलाईन लॉटरी’च्या रूपाने जुगाराचे नवे अड्डे बेकायदेशीरपणे चालविले जात आहेत. या जुगारामुळे रोज हजारो मराठी कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत व कित्येक तरुणांनी जुगारात सर्वस्व गमावल्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार सुरू आहे व त्यामुळेच अशा बेकायदेशीर जुगारी अड्यांना सरकार पाठीशी घालत आहे काय? लॉटरी रेग्युलेशन ॲक्ट 2010 चे संपूर्ण उल्लंघन करून ही ऑनलाईन लॉटरी महाराष्ट्रात सुरू आहे व त्यास जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या जुगाराच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये यासाठी महिन्याला साधारण 100 कोटींचा हप्ता वित्त विभाग, गृहविभागापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवला जाते. वित्त विभाग आणि गृहविभागाशी याबाबत मध्यस्थी करण्याचे काम गुजरात निवासी मंगलभाई नावाचा दलाल करतो. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, संपूर्ण महाराष्ट्रात या बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी जुगाराची उलाढाल सालाना 30 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.
मुंबईसह महाराष्ट्राच्या कित्येक जिल्ह्यांत या ऑनलाईन लॉटरी जुगाराचे 2500 पेक्षा जास्त अड्डे आहेत. या अड्ड्यांवर रोज हजारो लोकांची शेकडो कोटींची आर्थिक फसवणूक होते. महिन्याचे पगार घरी न जाता शेकडो नोकरदार लोक याच अड्ड्यांवर उडवत असल्याचे समजले. त्यामुळे असंख्य कुटुंबातील गृहणी, मुलाबाळांची अवस्था बिकट झाली आहे.

2018 साली केंद्र सरकारने देशभरातील अशा ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत सर्वच राज्यांना अशा बेकायदेशीरपणे चालणाऱ्या ऑनलाईन लॉटरीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराष्ट्रातील या ऑनलाईन लॉटरी जुगाराबाबत सीबीआय चौकशीची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती, पण तरीही हे जुगाराचे अड्डे सुरूच आहेत व त्यानंतर हप्त्यांचे आकडे मात्र वाढले.

मा. गृहमंत्री देवेंद्रजी, महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक तसेच कायदा-सुव्यवस्थेशी निगडित असा हा विषय आहे. अनेक सुशिक्षित तरुणांचे जीवन, त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन लॉटरी जुगारावर तत्काळ बंदी आणावी. महाराष्ट्राची आर्थिक लूट आणि मराठी जणांची फसवणूक थांबवावी. या निमित्ताने सुरू असलेल्या कोट्यवधींच्या लाचखोरीस आळा घालावा, अशी मी आपणास विनंती करीत आहे.

संजय राऊत यांनी पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना हे जुगार अड्डे बंद करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0