- सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराचा मुद्दा ऐरणीवर
पुणे, दि. ८ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Peregrine
खराडी येथील (Peregrine Guarding Pvt Ltd ) पेरेग्रीन कंपनीतील सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराच्या मुद्यावरून राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना आक्रमक झाली आहे. आज दि. ८ रोजी खराडी येथे कंपनीविरोधात निषेधात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला.
Peregrine Guarding Pvt Ltd कंपनीच्यावतीने कल्पतरू ट्रान्समिशन लि. येथे सुरक्षा रक्षक काम करत असताना एका वर्षाचा भविष्य निर्वाह निधी व थकीत पगाराच्या मुद्यावरून राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटनेचे अध्यक्ष शशांक तिकोणे यांच्या नेत्तृत्वाखाली सुरक्षा रक्षकानी कंपनी विरोधात आदोंलनाचा पावित्रा घेतला आहे.
मनसे कामगार सेनेचे नरेंद्र तांबोळी व राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटनेचे अध्यक्ष शशांक तिकोणे यांनी पेरेग्रीन कंपनी प्रशासनासमोर सुरक्षा रक्षकांच्या समस्या ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून चर्चेसाठी टाळाटाळ करण्यात आली. आंदोलन दाबून टाकण्यासाठी पोलिसांना बोलविण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, राष्ट्रीय नवनिर्माण कामगार संघटना (संलग्न महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना) अध्यक्ष शशांक तिकोणे, योगेश खडके, अमोल सावर्गावकर, अच्युतराव मुळावडे, अनिता पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्र मिररकडून याविषयी कंपनी अधिकाऱ्यांना माहिती विचारण्यात आली असता माहिती देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली.