Thane Drugs News : मुंब्रा पोलिसांची अंमली पदार्थविरोधात धडक कारवाई; 4 विदेशी नागरिकांना अटक, 1 कोटी 50 लाख 27 हजारांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त
मुंब्रा परिसरातील सम्राट नगर येथे धाड; 4 परदेशी तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ; 1.5 किलोपेक्षा जास्त एमडी पावडरसह इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि मोबाईल जप्त.
2 मिनिट वाचन

ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांचे सेवन, विक्री व बाळगणाऱ्यांविरोधात समूळ उच्चाटनासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार मुंब्रा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने 28 ऑक्टोबर 2029 रोजी सम्राट नगर परिसरात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली. तेथील हरीओम बिल्डिंगमध्ये वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांच्या संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून पंचांसमक्ष ही कारवाई करण्यात आली.
या धाडीत पोलिसांनी चार परदेशी नागरिकांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 50 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) रशीद मुजम्मिल सईदटी (मूळ गाव: तांझानिया)
2) हसन न्युमबे अली (वय-34 , मूळ गाव: तांझानिया)
3) केव्हीन् अडोल्फ वोसा (वय-26, मूळ गाव: तांझानिया)
4) ओबीअली अलेक्स झेंडर चीडीबेरे (वय-34 , मूळ गाव: नायजेरिया)
1.5 किलोहून अधिक एमडी जप्त; 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या ताब्यातून 35.25 लाख रुपये किमतीची 352.5 ग्रॅम ब्राऊन रंगाची एमडी पावडर आणि 1 कोटी 14 लाख 65 हजार रुपये किमतीची 1 किलो 146 ग्रॅम पांढरी/ब्राऊन रंगाची एमडी पावडर असा एकूण 1 कोटी 49 लाख 90 हजार रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वजनाकाटा व इतर साहित्य असे एकूण 1 कोटी 50 लाख 27 हजार 500 रुपयांचे मुद्देमाल जप्त केले आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8(क), 22(क) व 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना 29 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 5 नोव्हेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
दरम्यान, मुंब्रा पोलिसांनी सन 2026 मध्ये अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई करत आतापर्यंत 31 आरोपींवर गुन्हे नोंदवून सुमारे 32 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना त्यांची माहिती पोलिसांना द्यावी आणि अंमली पदार्थांसंदर्भात काही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.




