Mumbai Cyber Fraud : QR कोडचं भांडाफोड! जन्मापासून पदवीपर्यंत सगळीच कागदपत्रे बनावट — कफ परेडमध्ये ‘सायबर कॅफे फॅक्टरी’ उघडी!
मुंबई | महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप
2 मिनिट वाचन

मुंबई | महाराष्ट्र मिरर
विवेक राजेंद्र जगताप
Mumbai Cyber Fraud : चारित्र पडताळणीसाठी दिलेला एक साधा अर्ज आणि त्याला जोडलेला QR कोड— एवढ्याच धाग्यावरून जन्मप्रमाणपत्र, आधार, रेशनकार्ड, पदवी प्रमाणपत्र ते शासकीय शिक्क्यांपर्यंत बनावट कागदपत्रांचा धंदा कफ परेडमध्ये उघडकीस आला! कफ परेड पोलिसांनी सायबर कॅफे चालवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकून बनावट कागदपत्रांची ‘फॅक्टरी’च बंद पाडली.
हसीना सफीकुल खातुन हिने चारित्र पडताळणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना पोलिसांना संशय आला. जन्मप्रमाणपत्रावरील QR कोड स्कॅन करताच ‘This site can’t be reached’— आणि पोलिसांच्या भुवया उंचावल्या. पुढे आधारकार्डवरील फॉन्टमध्ये तफावत, रेशनकार्डवरील खोली क्रमांक वेगळ्या शाईत, तर १२ वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर सध्याच्या आधारकार्डवरीलच फोटो! QR कोड स्कॅन केला तर ‘Your search did not match any documents’— थेट बनाव उघडा!
ओरिजनल नाहीच! कागदपत्रांचा उगम ‘सायबर कॅफे’
पोलिसांनी ओरिजनल कागदपत्रे मागितली, पण एकही मूळ कागद उपलब्ध नाही! चौकशीत हसीनाने सांगितले— गणेशमूर्तीनगर, कफ परेड येथील ‘साह कम्युनिकेशन’ सायबर कॅफेमध्ये कागदपत्रे बनवली.
क्षणाचाही विलंब न करता सायबर पथकाने छापा टाकला आणि सुजितकुमार श्याम ठाकुर (वय २१) या कॅफे चालकाला ताब्यात घेतले.
कॅफेमधील संगणकांतून एडिटिंग टूल्स, सॉफ्टवेअर्स वापरून जन्मप्रमाणपत्र, आधार, रेशनकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे व शिक्के बनवले जात असल्याचे स्पष्ट झाले. हार्डड्राईव्ह जप्त करून फॉरेन्सिक तपासणीस पाठवण्यात आली.
सात जणांची कागदपत्रे बनावट! धंद्याची व्याप्ती मोठी
तपासात धक्कादायक बाब— या आरोपीने आणखी ७ जणांची विविध बनावट कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न. म्हणजेच चारित्र पडताळणीच्या नावाखाली सरकारी यंत्रणेला फसवण्याचा उघड प्रयत्न! आरोपीला अटक करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांची धडक कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त (परि-१) प्रविण मुंढे, सहा. पोलीस आयुक्त (कुलाबा) शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या पर्यवेक्षणात पो.नि. डोळे, स.पो.नि. अमित देवकर, पो.उ.नि. रूपेशकुमार भागवत, पो.शि. प्रविण यादव, अनिल उदागे, सुधाकर फलके, वसिम शेख यांनी ही कामगिरी बजावली.
प्रश्न उभा राहतो— अशा बनावट कागदपत्रांच्या जोरावर किती जण नोकऱ्या, घरे, हक्क बळकावत असतील? QR कोडने आज भांडाफोड झाला; उद्या किती ‘साह कम्युनिकेशन’ बाहेर येणार?




