मुख्य मजकुराकडे जा

मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात व्यावसायिकाला अटकपूर्व जामीन मंजूर

दिंडोशी सत्र न्यायालयाचा २५ हजारांच्या बाँडवर दिलासा; देश सोडण्यास आणि पीडितेला धमकावण्यास मनाई

M
mubarak

1 मिनिट वाचन

mumbai crime news

मुंबई, वृत्तसंस्था : मुंबईतील प्रसिद्ध मॉडेलने दाखल केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात व्यावसायिक रत्नभूषण सिंह यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या बाँडवर हा जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत. त्यानुसार, रत्नभूषण सिंह यांना देश सोडून जाता येणार नाही. तसेच तक्रारदार मॉडेल आणि साक्षीदारांना धमकावू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

रत्नभूषण सिंह यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ अग्रवाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. संबंधित मॉडेलने बलात्कारासह विविध गुन्हे दाखल करून आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचा दावा व्यावसायिकाकडून करण्यात आला होता.

संबंधित मॉडेलने बलात्कार आणि पाठलाग (स्टॉकिंग) यांसारखे विविध गुन्हे जाणीवपूर्वक ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने दाखल केल्याचा युक्तिवाद अॅड. सिद्धार्थ अग्रवाल यांनी केला. मॉडेलच्या तक्रारीनुसार रत्नभूषण सिंह यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, व्यावसायिकाने केलेल्या आरोपांनुसार, संबंधित मॉडेलने विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवून ब्लॅकमेलिंग केले. यातून आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर कार आणि अनेक स्थावर मालमत्ता मिळवल्या. तसेच व्यावसायिकाच्या पैशातून परदेश दौरे केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात व्यावसायिकाने संबंधित मॉडेलविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या खंडणीच्या गुन्ह्यात मॉडेलला न्यायालयाकडून अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.

या प्रकरणातील आरोप आणि प्रत्यारोपांबाबत पुढील न्यायालयीन कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

शेअर करा