IND Vs ENG : शतकांचा वर्षाव! पंत-गिलची तुफान खेळी;ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा यष्टीरक्षक फलंदाज
• गिलच्या नेतृत्वात भारताचा दमदार सुरुवातीनं इंग्लंडला झटका
1 मिनिट वाचन

•गिलच्या नेतृत्वात भारताचा दमदार सुरुवातीनं इंग्लंडला झटका
BCCI :- भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांची अक्षरशः वाताहत केली. नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी घाम फोडला.
यशस्वी जैस्वालने 101 धावांची शानदार सलामी दिल्यानंतर, कर्णधारपदाची धुरा पहिल्यांदाच सांभाळणाऱ्या शुबमन गिलने नाबाद 127 धावा करत आपली नेतृत्वशैली सिद्ध केली. मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते ऋषभ पंतने. पहिल्या दिवशी 65 धावांवर नाबाद असलेला पंत दुसऱ्या दिवशी शतकी खेळी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील ७वे शतक झळकावलं आणि एमएस धोनीच्या 6 शतकांचा विक्रम मागे टाकला.
पंतने या खेळीसह केवळ धोनीचाच नव्हे, तर फारुख इंजिनिअर व सय्यद किरमानी यांच्यासारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे. परदेशात सर्वाधिक धावा करणारा आशियाई यष्टिरक्षक म्हणूनही त्याने धोनीच्या पुढे झेप घेतली. विशेष म्हणजे पंतने कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा अवघ्या 76 डावात गाठून दुसरा सर्वात वेगवान यष्टीरक्षक ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी ऑस्ट्रेलियाचा ॲडम गिलख्रिस्ट आहे.
भारताने पहिल्या दिवशी 3 गडी गमावून 359 धावा करत इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं आहे. या सामन्यात साई सुदर्शन शून्यावर बाद झाला, तर केएल राहुलने 42 धावा केल्या. एकूणच, भारतीय फलंदाजीचा हा तडाखेबंद प्रदर्शन मालिकेला रंगत आणणारा ठरत आहे.
हेही वाचा: Mira Road Crime News : दुचाकी चोरणारा 'चरबा' अखेर गजाआड!




