मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Dombivli Marriage Scam : डोंबिवलीत लग्नाच्या आमिषाने तरुणीला 10 लाखांचा गंडा; नेदरलॅंडच्या 'संजय भरल'ने भेटवस्तूंच्या नावाखाली लुटले

Dombivli Latest Marriage Scam News : मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात; कुरियर चार्जेस आणि कस्टमच्या नावाने टोळीने उकळले पैसे

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Fake Marriage Scam News

Dombivli Latest Marriage Scam News : मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात; कुरियर चार्जेस आणि कस्टमच्या नावाने टोळीने उकळले पैसे

डोंबिवली | विवाहासाठी सुयोग्य वराच्या शोधात असलेल्या डोंबिवलीतील एका 33 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीची सायबर भामट्यांच्या टोळीने 10 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. 'शादी डॉट कॉम' या प्रसिद्ध विवाह संकेतस्थळावरून सुरू झालेली ही ओळख एका मोठ्या आर्थिक फसवणुकीत रूपांतरित झाली असून, याप्रप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसाच्या 'गिफ्ट'चा असा रचला सापळा

डोंबिवलीतील आयरे रोड परिसरात राहणारी ही तरुणी मुंबईत बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी तिची ओळख स्वतःला नेदरलॅंडमध्ये स्थायिक असलेला 'कन्नड ब्राह्मण' सांगणाऱ्या संजय भरल या तरुणाशी झाली. दोघांचे व्हॉट्सॲपवर बोलणे सुरू झाले आणि लवकरच लग्नाचे स्वप्न दाखवण्यात आले. या तरुणीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजयने तिला नेदरलॅंडहून सोने आणि महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले.

टप्प्याटप्प्याने उकळली 10 लाखांची रक्कम

भेटवस्तूंचे पार्सल भारतात आल्याचे भासवून कुरियर कंपनीच्या नावाने या तरुणीला फोन येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कुरियर शुल्क म्हणून 32 हजार रुपये, त्यानंतर कायदेशीर शुल्क, बँक ट्रान्सफर आणि सोन्याचे डिटेंशन चार्जेस अशा विविध कारणांसाठी दीड लाख ते साडेतीन लाखांपर्यंतच्या रकमा भरण्यास तिला भाग पाडले गेले. सोन्याच्या दागिन्यांच्या आमिषाने तरुणीने वेळोवेळी एकूण 10 लाख 29 हजार रुपये भामट्यांच्या खात्यात जमा केले.

असा उघड झाला बनाव

रक्कम उकळण्याचा प्रकार थांबत नसल्याने तरुणी त्रस्त झाली होती. दरम्यान, संजयने आपण दिल्ली विमानतळावर पोहोचलो असून सुरक्षा विभागाने पकडले आहे, असे सांगून आणखी 85 हजार रुपयांची मागणी केली. संशय आल्याने तरुणीने संजयचा व्हॉट्सॲप नंबर ब्लॉक केला. त्यानंतर काही वेळातच कुरियर कंपनीच्या कर्मचाऱ्याने तिला फोन करून "संजय तुम्हाला भेटायला दिल्लीत आला आहे, तुम्ही त्याला ब्लॉक का केले?" असे विचारले. नेदरलॅंडहून आलेल्या संजयबद्दल कुरियर कंपनीला माहिती कशी मिळाली, या प्रश्नाने तरुणीची खात्री पटली की ही एक संघटित फसवणूक आहे.

पोलिसांत धाव

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणातील 'संजय भरल' आणि कुरियर कंपनीच्या नावाखाली फोन करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

शेअर करा