मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं!
‘मी विशलिस्टमध्ये नाही, वास्तवात जगतो’; पुण्यातील यूथ फेस्टिव्हलमध्ये युवकांच्या प्रश्नाला दिले उत्तर; एफडीएच्या कारभारातील सुधारणांचीही मांडणी केली
2 मिनिट वाचन

पुणे : राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांची राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांच्या कामाची पद्धत, स्पष्टवक्तेपणा आणि कडक शिस्त यामुळे तरुणांमध्येही त्यांच्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. नुकतेच पुण्यातील यूथ फेस्टिव्हलमध्ये त्यांनी हजारो युवक-युवतींशी संवाद साधला. यावेळी एका तरुणाने त्यांना थेट मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर मुंढे यांनी दिलेले उत्तर चर्चेचा विषय ठरले आहे.
‘मुख्यमंत्री होणे ही केवळ विशलिस्टचा भाग; मी वास्तवात जगणारा लोकसेवक’
मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, "मुख्यमंत्री होणे हा केवळ विशलिस्टचा भाग आहे. मुळात मी विशलिस्टमध्ये राहत नाही, तर वास्तवात जगतो. मी एक लोकसेवक आहे. केवळ नोकरीपुरती स्वतःची भूमिका मर्यादित न ठेवता, ती समजून घेऊन जगण्याचा प्रयत्न करतो." प्रत्येक व्यक्तीचा स्वाभिमान आणि प्रतिष्ठा जपणे, हीच आपल्या जीवनाची व्याख्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एफडीएच्या कामकाजातील बदल आणि कारवाईबाबतही त्यांनी भाष्य केले. मागील सहा महिन्यांच्या कामाचा आणि सध्याच्या कामाचा आढावा घेतला, तर यावेळी कामाचा वेग काहीसा कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, आवश्यक यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासह विविध सुधारणा सुरू असल्याचे सांगितले.
पूर्वी अन्न व औषध नमुन्यांचे तपासणी अहवाल मिळण्यासाठी ३० दिवसांपासून ते सहा महिन्यांपर्यंतचा कालावधी लागत होता. मात्र, आता हा कालावधी कमी करून १४ दिवसांवर आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेल्थ सप्लिमेंटच्या विक्रीवरही कारवाईचा इशारा
हेल्थ सप्लिमेंट आणि प्रोटीन उत्पादनांच्या विक्रीबाबतही मुंढे यांनी महत्त्वाचे विधान केले. हेल्थ सप्लिमेंटला कोणत्याही प्रकारची सरसकट मान्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिम चालक किंवा प्रोटीन विक्रेत्यांना नियमबाह्य पद्धतीने अशी उत्पादने विकण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची विक्री होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय कामकाजातील शिस्त, धडाकेबाज निर्णय आणि स्पष्ट भूमिकेमुळे ते सध्या राज्यभर चर्चेत आहेत. पुण्यातील युवकांशी संवाद साधताना मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांनी मांडलेली भूमिका आणि एफडीएतील सुधारणांची माहिती यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

महाराष्ट्र मिरर




