पुण्यातील रस्ते घेतायत मोकळा श्वास
अतिक्रमणविरोधी कारवाईत सोमवारच्या एकाच दिवसात शहरातील सहा परिमंडळांमध्ये २ लाख ५ हजार ८०० चौ. फूट जागा केली मोकळी; कोणाचीही गय न करण्याचा आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा; शहरातील अतिक्रमणधारकांसह राजकीय वर्तुळाचेही दणाणले धाबे
4 मिनिट वाचन

अतिक्रमणविरोधी कारवाईत सोमवारच्या एकाच दिवसात शहरातील सहा परिमंडळांमध्ये २ लाख ५ हजार ८०० चौ. फूट जागा केली मोकळी; कोणाचीही गय न करण्याचा आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा; शहरातील अतिक्रमणधारकांसह राजकीय वर्तुळाचेही दणाणले धाबे
अतिक्रमण करणारा सर्वसामान्य व्यावसायिक असो किंवा राजकीय व्यक्तीशी संबंधित, कोणाचीही गय केली जाणार नाही. कोणताही दबाव किंवा हस्तक्षेप न जुमानता ही कारवाई मार्च २०२७ पर्यंत सुरूच राहील. पुढील चार महिन्यांत मोहीम अधिक तीव्र केली जाईल." -नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे मनपा
महत्वाचे मुद्दे
*‘फोनाफोनी’ला न जुमानता ६ झोनमध्ये धडक कारवाई; मार्च २०२७ पर्यंत मोहीम सुरूच राहणार
*मोहिमेअंतर्गत वृद्धेश्वर घाट, वडगाव फाटा, जेम कॉर्नर आणि कोथरूड परिसरातील अतिक्रमणे उद्ध्वस्त
*सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांचाही समावेश असल्याने शहरात खळबळ
*वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी बांधकामे आणि अनधिकृत शेड काढून टाकण्यात आले
पुणे, धनश्री ओतारी
शहरातील अतिक्रमणांवरून सभागृहात प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्याच वर्तुळात आता पुणे महापालिकेच्या कारवाईचा बुलडोझर धडकला आहे. राजकीय दबाव, शिफारशी आणि ‘फोनाफोनी’ला कोणतीही भीक न घालता प्रशासनाने सत्ताधारी नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालवला आहे.
सोमवारच्या एकाच दिवसात शहरातील सहा परिमंडळांमध्ये (झोन) तब्बल २ लाख ५ हजार ८०० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करून महापालिकेने आपला कडक इरादा स्पष्ट केला आहे. ही मोहीम केवळ दोन-चार दिवसांची नसून, ती थेट मार्च २०२७ पर्यंत अखंडपणे सुरूच राहणार असल्याचा सज्जड इशारा महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिल्याने शहरातील अतिक्रमणधारकांसह राजकीय वर्तुळाचेही धाबे दणाणले आहेत.
राजकीय दबावाला न जुमानता धडक मोहीम
अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत सोमवारी ही धडक मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत वृद्धेश्वर घाट येथील अनधिकृत हॉटेलसह वडगाव फाटा, जेम कॉर्नर आणि कोथरूड परिसरातील अतिक्रमणे जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांशी संबंधित व्यक्तींच्या अतिक्रमणांचाही समावेश असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी कोथरूडमध्ये एका मंत्र्याच्या नातेवाइकाचे अतिक्रमणही प्रशासनाने हटविले होते. ही कारवाई रोखण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार फोनाफोनी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, मात्र प्रशासनाने कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई सुरूच ठेवली.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयांमध्येच कथित अनधिकृत बांधकामे असल्याचा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांना निवेदन दिले होते. सर्वसामान्य व्यावसायिक आणि टपरीधारकांवर कारवाई होत असताना लोकप्रतिनिधींशी संबंधित अतिक्रमणांना प्रशासन हात लावणार का, असा संतप्त सवाल त्यातून विचारला गेला होता.
आता प्रशासनाने थेट नगरसेवकांशी संबंधित अतिक्रमणांवरच बुलडोझर चालवण्यास सुरुवात केल्याने या टीकेला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर आणि संबंधित परिमंडळांच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली शहरातील प्रमुख रस्ते, चौक, व्यापारी परिसर आणि इमारतींच्या फ्रंट व साइड मार्जिनमध्ये झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.
उपनगरांपासून मध्यवर्ती पेठांपर्यंत कारवाईचा धडाका
महापालिकेच्या सहा झोनमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी बांधकामे आणि अनधिकृत शेड काढून टाकण्यात आले.
झोन क्रमांक १ (हांडेवाडी): वेगाने विकसित होणाऱ्या आणि वाढत्या अतिक्रमणांमुळे प्रभावित झालेल्या हांडेवाडी रोड आणि हांडेवाडी चौक परिसरात सर्वाधिक ६७ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.
झोन क्रमांक २ (वडगाव बुद्रुक-धायरी): सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या वडगाव बुद्रुक आणि धायरी परिसरातील रस्त्यांवर अडथळा ठरणारी ३८ हजार २०० चौरस फूट क्षेत्रावरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
झोन क्रमांक ३ (वारजे): महामार्गावरील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या वारजे परिसरातील सर्व्हिस रोडवर १८ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे काढण्यात आली.
झोन क्रमांक ४ (मध्यवर्ती व पूर्व भाग): ढोले पाटील रोड, ताडीवाला रोड, कोरेगाव पार्क आणि नॉर्थ मेन रोड परिसरात ४४ हजार ७०० चौरस फुटांवर, तर मध्यवर्ती भागातील नाना पेठ आणि रास्ता पेठ परिसरात १४ हजार चौरस फुटांवर अशी एकूण ५८ हजार ७०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
झोन क्रमांक ५ (टिळक रोड): शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळक रोड परिसरातील ९ हजार ५०० चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
झोन क्रमांक ६ (कर्वे रोड-लॉ कॉलेज रोड): वृद्धेश्वर घाट, लॉ कॉलेज रोड आणि कर्वे रोड परिसरात इमारतींच्या फ्रंट व साइड मार्जिनमधील नियमांचे उल्लंघन करून उभारलेली १३ हजार ५०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.
पुन्हा अतिक्रमण झाल्यास कठोर फौजदारी कारवाईचा इशारा
महापालिका प्रशासनाने एकाच दिवसात सव्वा दोन लाख चौरस फुटांहून अधिक क्षेत्र मोकळे करून मोठी धडक दिली असली, तरी खरी कसोटी यापुढे असणार आहे. कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या मोकळ्या झालेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमणे उभी राहतात, असा पुणेकरांचा आजवरचा कटू अनुभव आहे. हे लक्षात घेऊन अतिक्रमण हटवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केल्यास संबंधितांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. या मोकळ्या झालेल्या रस्त्यांवर आणि पदपथांवर कायमस्वरूपी लक्ष ठेवण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना जबाबदारी देण्यात आली असून, प्रशासन ही यंत्रणा कशी राबवते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
दगड फेकला तरी कारवाई होणार......
पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने हांडेवाडी रोडवरील सय्यदनगर आणि गंगा व्हिलेज परिसरात सलग सहाव्या दिवशी अतिक्रमण हटाव कारवाई केली. या कारवाईदरम्यान जेसीबीवर दगडफेक झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर अतिक्रमण विभाग प्रमुख (उपायुक्त) सोमनाथ बनकर यांनी दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी कारवाईला विरोध करणाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला.
https://epaper.maharashtramirror.com/

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




