Mahaparinirvan Din 2024: महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो 6 डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे (Dr Babasaheb Ambedkar) 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्त्व’ मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 1 डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे 25 लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये 7 डिसेंबर 1956 रोजी 12 लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आदरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी 1 डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेविका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. 25 लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
बाबासाहेबांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन
डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. ते त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीचे होते. आंबेडकरांना त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जातीय भेदभाव आणि सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला. मात्र त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ यांनी त्यांना शिक्षणाची प्रेरणा दिली.
बौद्ध धर्मात दीक्षा आणि निधन
आंबेडकरांनी 1956 मध्ये दलित समाजासह बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांचा असा विश्वास होता की बौद्ध धर्माची तत्त्वे सामाजिक समता आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देतात. 6 डिसेंबर 1956 रोजी दीर्घकाळ आजारी असलेले आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांचे अनुयायी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति स्थळी म्हणजे चैत्यभूमीला अभिवादन करतात.