Loksabha Election 2024 : सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांच्या नाराजीचे सूर, महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचे दिले पत्र
•Vishwajeet Kadam महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना यांनी सांगलीच्या जागेबाबत परस्पर घोषणा केल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत विरोध
मुंबई :- सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीमध्ये मोठी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात देखील पाहायला मिळत आहे. सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी आणि त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल असे म्हणत आमदार विश्वजीत कदम यांनी आता खरोखरच टोकाची भूमिका घेत पाऊले उचलले आहे.
जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण काँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं विश्वजित कदम यांनी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळवले आहे. कारण ठाकरे गटाने सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याला स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे कदम देखील आक्रमक झाले आहेत.
.. तर तो पर्यंत पक्षाच्या बैठकीला येणार नाही आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तशा आशयाचं एक पत्र लिहिलं आहे. सांगलीच्या जागेबद्दल आपल्या भावना काय आहेत हे तुम्ही जाणता, त्यामुळे महाविकास आघाडीकडून सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आपण पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही असं विश्वजित कदम म्हणाले. त्यामुळे कदम यांच्या भूमिकेमुळे राज्यात व विशेषकरून महाविकास आघाडीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
विश्विजत कदम यांनी पत्रात काय म्हटले?
राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी आणि सांगलीतील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतील असणारी भावना आपण जाणत आहात. गेल्या काही दिवसांपासून सांगली आणि राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे या भूमिकेवरती मी आणि सांगली जिल्ह्याती कार्यकर्ते आजही ठाम आहोत. तसेच अद्यापही सांगली लोकसभा जागेबाबतील काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीने आम्हाला कोणताही निर्णय कळवलेला नाही. त्यामुळे जोपर्यत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार म्हणून मी पक्षाच्या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराची सुरुवातही केली. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी काँग्रेसची होती. त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी गेल्या 5 वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या जागेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी ती घेईन अशी भूमिका विश्वजित कदम यांनी घेतली आहे.