Kalyan Sex Racket : हॉटेलमध्ये देहविक्रीचा गोरखधंदा उघड! महिला दलाल जेरबंद, चार पिडीतांची सुटका

Kalyan Latest Sex Racket News : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची गुप्त माहितीवर कारवाई; कल्याण फाट्यावर सापळा रचून दलाल महिला अटकेत
कल्याण | कल्याण फाट्यावरील ‘हॉटेल शुभम कम्फर्ट रेस्टॉरंट’मध्ये चालणाऱ्या देहविक्रीच्या गोरखधंद्याचा भांडाफोड करत ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक महिला दलाल अटकेत असून, तिच्या तावडीतून चार असहाय्य महिलांची सुटका करण्यात आली आहे.
27 जून 2025 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. महिला दलाल पिडीत महिलांना फूस लावून वेश्या व्यवसायासाठी वापरणार असल्याची गुप्त खबर मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ सापळा रचत छापा टाकला.
छाप्यात महिला दलालास रंगेहात अटक करण्यात आली असून तिच्या ताब्यातून चार पिडीत महिलांना सोडवण्यात आले आहे.
या प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात, भारतीय दंड विधान कलम 143(1), 143(3) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे,विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंध), गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वालगुडे, पोलीस हवालदार किशोर पाटील, सुवारे, महिला पोलीस अंमलदार खरात, थोरात, व्ही.बी.यादव , पोलीस शिपाई पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.


