मुंबई

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ‘हायव्होल्टेज’ ड्रामा! ठाकरेंचे 4 नगरसेवक ‘डांबून’ ठेवल्याचा आरोप; पोलिसांत तक्रार करण्याचा अल्पेश भोईरांचा इशारा

•“आमच्या मनाच्या विरुद्ध आम्हाला ठेवले आहे”; नगरसेवकांचे वारंवार फोन येत असल्याचा दावा; शिंदे गट-मनसेच्या युतीनंतर संशयाचे धुके

कल्याण l कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत बहुमतासाठी 62 चा आकडा गाठण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या प्रक्रियेत आता गुन्हेगारी वळण लागल्याचे चित्र आहे. शिवसेना (UBT) गटाचे नेते अल्पेश भोईर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले 11 पैकी 4 नगरसेवक सध्या शिंदे गट आणि मनसेच्या ताब्यात असून त्यांना एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले आहे.

काय आहे नेमका वाद?

बुधवारी कोकण भवन येथे जेव्हा शिवसेना (ठाकरे) गटाने आपल्या नगरसेवकांची नोंदणी केली, तेव्हा केवळ 7 नगरसेवक हजर होते. उर्वरित 4 नगरसेवकांबद्दल संशय व्यक्त केला जात होता. अल्पेश भोईर यांच्या मते, हे चारही सदस्य सातत्याने फोन करून आपल्याला वाचवण्याची विनंती करत आहेत. “आम्हाला आमच्या इच्छेविरुद्ध ठेवण्यात आले आहे, आमची शिंदे गट किंवा मनसेशी युती करण्याची अजिबात इच्छा नाही,” असे या नगरसेवकांनी सांगितल्याचा दावा भोईर यांनी केला आहे.

पोलीस तक्रारीचा इशारा अल्पेश भोईर यांनी संबंधित नेत्यांना थेट इशारा दिला आहे की, “जर आज सायंकाळपर्यंत आमच्या चारही नगरसेवकांना प्रसारमाध्यमांसमोर आणून त्यांची भूमिका स्पष्ट करू दिली नाही, तर आम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात ‘नगरसेवक हरवल्याची’ आणि त्यांच्या ‘अपहरणाची’ तक्रार दाखल करू.”

सत्ता समीकरणांची गोळाबेरीज

एकूण जागा: 122 (बहुमतासाठी 62 आवश्यक)

शिवसेना (शिंदे गट): 53 (सर्वात मोठा पक्ष)

भाजप: 50

शिवसेना (ठाकरे): 11 (ज्यातील 4 ‘नॉट रिचेबल’)

मनसे: 5 (शिंदे गटाला पाठिंबा जाहीर)

मनसे-शिंदे युती आणि पेच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आपल्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा शिंदे गटाला दिल्याने खळबळ उडाली होती. मात्र, शिंदे गट भाजपला बाजूला ठेवून स्वतःचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांना ठाकरे गटाचे उरलेले 4 नगरसेवक फोडणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक आहे. यामुळेच या नगरसेवकांना गायब केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0