Pune Rain Update : पुण्यात पावसाचा हाहाकार! जुने वाडे, भिंती कोसळल्या
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 मिनट पठन

Pune Rain Update : अतिवृष्टीमुळे पुणे शहरात ठिकठिकाणी दुर्घटना; अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Rain Update : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी (दि. ६) शहरात अक्षरशः कहर केला. सततच्या संततधारेमुळे शहरातील पेठांमधील जुने वाडे, विविध भागांतील गृहनिर्माण संस्थांच्या संरक्षण भिंती कोसळण्याच्या आणि मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. (pune rain updates wada collapse)

नाना पेठ, सोमवार पेठ, घोरपडी, सिंहगड रस्ता, जांभूळवाडी आणि वडगाव शिंदे या भागांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने दाखवलेली तत्परता आणि वेळेत केलेल्या बचावकार्यामुळे सर्व दुर्घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Pune Rain Update)
नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली; दुचाकींचे नुकसान
सोमवारी दुपारच्या सुमारास नाना पेठेतील साखळीपीर तालीम परिसराजवळ असलेल्या एका जुन्या वाड्याची भिंत अचानक पत्त्यासारखी कोसळली. या भिंतीचा भलामोठा ढिगारा थेट रस्त्यावर आल्याने एकच खळबळ उडाली. भिंतीच्या लगत उभ्या असलेल्या तीन दुचाकी या राडारोड्याखाली पूर्णपणे दबल्या गेल्या. (Pune Rain Update)
Khadakwasla Dam : धरणातून ५०० क्युसेकचा विसर्ग सुरू; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ बंबासह घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी प्रथम ढिगाऱ्याखाली कोणी नागरिक अथवा पादचारी अडकला आहे का, याची कसून खात्री केली. सुदैवाने ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसल्याचे स्पष्ट झाल्यावर जवानांनी अथक प्रयत्नांनी राडारोडा बाजूला करून ढिगाऱ्याखाली दबलेल्या तीनही दुचाकी सुरक्षितपणे बाहेर काढल्या. (Pune Rain Update)
सोमवार पेठेत दुमजली वाडा कोसळला; परिसर रिकामा
यानंतर संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेतील धनगर गल्ली येथे दुसरी मोठी दुर्घटना घडली. येथील एक जुना दुमजली वाडा पावसाच्या माऱ्यामुळे कमकुवत होऊन कोसळला. वाडा कोसळत असताना मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वाड्याचा उर्वरित भागही धोकादायक अवस्थेत असल्याने जवानांनी कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला. योग्य वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवल्यामुळे या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला. (Pune Rain Update)
Rain Update : महाबळेश्वर, पाचगणीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद!
पिंपळाचे झाड कोसळून घोरपडीत घरांचे नुकसान, भिंतींना तडे
पेठांमधील वाड्यांशिवाय उपनगरांमध्येही पावसाने मोठे नुकसान केले आहे. घोरपडी गावात एक अवाढव्य पिंपळाचे झाड उन्मळून पडले. हे झाड लगतच्या वस्तीवर कोसळल्याने सुमारे ७ ते ८ घरांचे मोठे नुकसान झाले असून घरांची छपरे आणि भिंती चेपल्या गेल्या आहेत.
याशिवाय, सिंहगड रस्त्यावरील कोरड वस्ती तसेच जांभूळवाडी भागात मुसळधार पावसामुळे सोसायट्यांच्या मोठ्या संरक्षण भिंती (Retaining Walls) कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये केवळ वित्तहानी झाली असून कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही.
वडगाव शिंदे येथे पूरस्थिती; १५ ते २० नागरिकांची सुटका
मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वडगाव शिंदे गावात इंद्रायणी नदीचे पाणी शिरल्याने अनेक घरांना पुराच्या पाण्याने वेढले. पाहता पाहता नागरिकांच्या घरांमध्ये ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी साचले, ज्यामुळे अनेक कुटुंबं घरातच अडकून पडली. या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच धानोरी अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तात्काळ रेस्क्यू बोट आणि आपत्कालीन साहित्यासह वडगाव शिंदे धाव घेतली.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
जवानांनी पूरग्रस्त भागातून अत्यंत कौशल्याने १५ ते २० अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या यशस्वी बचावकार्यामुळे स्थानिक प्रशासनाने अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत. (Pune Rain Update)
२४ तासांत झाडे पडण्याच्या ८३ घटना; आठवड्याचा आकडा १६३ वर
गेल्या २४ तासांत म्हणजेच ५ जुलै संध्याकाळी ते ६ जुलै संध्याकाळीपर्यंत झाडपडीच्या ८३ घटना घडल्या असून १ ते ६ जुलै (चालू आठवड्यातील एकूण नोंद) १६३ झाडपडीच्या घटनेची नोंद झाली आहे. (Pune Rain Update)
अग्निशमन दलाचे आवाहन
"शहरात सातत्याने पाऊस सुरू असल्याने जुन्या इमारती, वाडे आणि कमकुवत झालेल्या भिंतींच्या भागांत नागरिकांनी अधिक सतर्क राहावे. रस्त्यावरून जाताना मोठ्या झाडांखाली अथवा धोकादायक फलकांखाली आश्रय घेऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधावा."

शहरातील पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवस हवामान खात्याने दक्षतेचा इशारा दिला आहे. पालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
