मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Murder : पुण्यातील धनकवडीत मद्यपानाच्या वादातून निर्घृण खून

Pune Murder : पुण्यातील धनकवडी परिसरातील शंकर महाराज उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गात एक घटना घडली आहे.

धओ
धनश्री ओटारी

2 मिनट पठन

Pune Murder
File Photo

Pune Murder : आईवरून दिलेल्या शिवीगाळीचा राग जीवावर बेतला

Pune Murder : पुण्यातील धनकवडी परिसरातील शंकर महाराज उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गात एक घटना घडली आहे. मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाची फरशीचा दगड डोक्यात घालून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर काही तासांतच सहकारनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ( Pune Murder dhankawadi police )

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण उर्फ बिट्या रवी वाघमारे (वय २४, रा. संभाजीनगर) आणि मृत तरुण हे दोघेही शंकर महाराज मठ परिसरात एकमेकांच्या परिचयाचे होते. मृत तरुण हा काही दिवसांपूर्वीच त्या परिसरात आला होता आणि कचरा वेचून तसेच मठात मिळणाऱ्या प्रसादावर आपला उदरनिर्वाह करत होता. आरोपी बिट्या वाघमारे याची आई त्याच परिसरात फुले विकण्याचे काम करते. या ओळखीमुळे दोघेही नेहमी एकत्र मद्यपान करत असत. ( Pune Murder )

Jejuri road accident : वारीच्या वाटेवर काळाचा घाला;  ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

रविवारी रात्रीच्या सुमारास दोघेही शंकर महाराज उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गात मद्यपान करण्यासाठी बसले होते. मद्यपान सुरू असताना त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मृत व्यक्तीने आरोपीला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्या बहिणीला दिलेल्या शिवीचा आरोपीला प्रचंड राग आला. रागाच्या भरात बिट्या वाघमारे याने जवळच पडलेला फरशीचा दगड उचलला आणि मृत व्यक्तीच्या डोक्यात दोन वेळा जोरात प्रहार केले. या भीषण हल्ल्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ( Pune Murder )

अशी झाली आरोपीला अटक
हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट आपल्या आईच्या फुलांच्या दुकानावर गेला. तिथे तो सामान आवरण्याचा आव आणू लागला. त्याने आपल्या आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तो पुन्हा घटनास्थळी जाऊन ती व्यक्ती जिवंत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी परत गेला होता. मात्र, दरम्यानच्या काळात नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. ( Pune Murder )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि परिसरातील माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांतच आरोपी बिट्या वाघमारे याला ताब्यात घेतले. आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

Jejuri Accident: 3 Warkaris Killed, 4 Injured on Saswad Highway

या घटनेबाबत सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार म्हणाले, “आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मद्यपानाच्या नशेत किरकोळ कारणावरून झालेला वाद आणि आईवरून दिलेली शिवीगाळ या एका क्षणाच्या रागातून ही दुर्दैवी घटना घडली आहे. आम्ही घटनास्थळाचे पंचनामे पूर्ण केले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सतर्क आहेत आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे."

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

आरोपीविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष जाधव करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

शेयर करें