Nilesh Rane : विधान परिषद निकालानंतर महायुतीत जुंपली; भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांवर आमदार निलेश राणेंचा सणसणीत पलटवार
•Nilesh Rane On Navnath Ban तुझी लायकी किती तू बोलतो किती!
1 मिनट पठन

•Nilesh Rane On Navnath Ban तुझी लायकी किती तू बोलतो किती! शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं; निलेश राणेंचा थेट इशारा.
मुंबई :- राज्यातील पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निकालानंतर महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला आहे. पाचपैकी तीन जागांवर महायुतीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी महायुतीच्या या अपयशाचे खापर थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर फोडले. शिवसेनेने युतीधर्म न पाळल्यामुळे आणि योग्य सहकार्य न केल्यामुळेच भाजप उमेदवारांचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी पक्ष नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला होता.
नवनाथ बन यांच्या या वादग्रस्त निवेदनानंतर शिंदे सेनेतील नेते प्रचंड आक्रमक झाले असून, महायुतीतील दोन्ही घटकांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. मित्रपक्षांना मान दिला पाहिजे, सर्वच जागा भाजप लढवणार का, असा सवाल करत शिवसेनेच्या नेत्यांनी बन यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे.
"लायकीत राहायचं!"; आमदार निलेश राणेंची सोशल मीडियावर थेट टोलेबाजी
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेवर घेतलेल्या आक्षेपांनंतर शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी अत्यंत आक्रमक आणि कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. निलेश राणे यांनी सोशल मीडियावरून दोन ओळींचा थेट इशारा देत नवनाथ बन यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
"नवनाथ बन, शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती तू बोलतो किती," अशा कडक शब्दांत निलेश राणे कडाडले आहेत. एकनाथ शिंदेंवर केलेली कोणतीही नाहक टीका खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमच राणेंनी दिला आहे. या राजकीय कलगीतुऱ्यामुळे विधान परिषद निकालानंतर महायुतीमधील अंतर्गत तणाव अधिकच चव्हाट्यावर आला आहे.
