Hardeep Singh Puri : इंधन तुटवड्याच्या अफवांवर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण; हरदीप सिंग पुरी यांचे ट्विट, "देशात लॉकडाऊन लागणार नाही!"
• मध्य पूर्वेतील युद्धाचा पुरवठ्यावर परिणाम नाही; नागरिकांनी घाबरून 'पॅनिक बाइंग' करू नये, पेट्रोलियम मंत्र्यांचे आवाहन
1 मिनट पठन

•मध्य पूर्वेतील युद्धाचा पुरवठ्यावर परिणाम नाही; नागरिकांनी घाबरून 'पॅनिक बाइंग' करू नये, पेट्रोलियम मंत्र्यांचे आवाहन
ANI :- आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे भारतात इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या असून, सोशल मीडियावर 'पेट्रोल-डिझेल संपणार' आणि 'देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार' अशा अफवांना उधाण आले आहे. या सर्व चर्चांना पूर्णविराम देत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेला आश्वस्त केले आहे.
लॉकडाऊनच्या अफवा फेटाळल्या
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केले की, देशात कोणताही लॉकडाऊन लागू करण्याचा सरकारचा विचार नाही. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अशा बातम्या धादांत खोट्या असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सरकार प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी नमूद केले.
इंधन आणि गॅस पुरवठा सुरळीत
"देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सरकार सतत पुरवठा साखळीवर लक्ष ठेवून आहे," असे पुरी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ताण असला तरी, भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आलेली नाही. नागरिकांनी घाबरून जाऊन (Panic Buying) गरजेपेक्षा जास्त इंधन भरू नये किंवा साठा करू नये, ज्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
व्यावसायिक गॅस तुटवड्यावर उपाययोजना
सध्या काही भागांत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तेल कंपन्यांना पुरवठा जलद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घरगुती गॅस ग्राहकांना नियमितपणे सिलेंडर मिळत राहतील, याची खात्री सरकारने दिली आहे.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचे संकेत
सोशल मीडियाच्या माध्यमातून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सरकार आणि स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे. इंधन तुटवड्याबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
