Dombivli News : डोंबिवली स्थानक परिसरात आरटीओचा 'सर्जिकल स्ट्राईक'! नियम धाब्यावर बसवणाऱ्या 50 हून अधिक रिक्षांवर कारवाई; बेशिस्त चालकांचे धाबे दणाणले
• विनापरवाना आणि भंगार रिक्षांच्या प्रवासाला ब्रेक; कल्याण आरटीओ आणि डोंबिवली वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम | कागदपत्रे नसलेल्या आणि गणवेश टाळणाऱ्या चालकांना मोठा दंड
1 मिनट पठन

•विनापरवाना आणि भंगार रिक्षांच्या प्रवासाला ब्रेक; कल्याण आरटीओ आणि डोंबिवली वाहतूक पोलिसांची संयुक्त मोहीम | कागदपत्रे नसलेल्या आणि गणवेश टाळणाऱ्या चालकांना मोठा दंड
डोंबिवली :- डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर नियमांची ऐशीतैशी करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. उपप्रादेशिक परिवहन विभाग (कल्याण) आणि डोंबिवली वाहतूक विभागाने राबवलेल्या संयुक्त मोहिमेत 50 हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे स्थानक परिसरातील 'माफियागिरी' करणाऱ्या आणि अनधिकृत रिक्षा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
तक्रारींची दखल आणि अचानक छापेमारी
डोंबिवली स्थानक परिसरात अनेक रिक्षा चालक परवान्याशिवाय रिक्षा चालवतात, काही रिक्षांचे आयुर्मान संपूनही त्या रस्त्यावर धावत आहेत, अशा तक्रारी कल्याण आरटीओ कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहरात अचानक तपासणी सुरू केली.
कुठे झाली कारवाई?
प्रशांत सूर्यवंशी, भाग्यश्री आवार आणि राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोंबिवलीतील महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी केली होती:
डोंबिवली पूर्व: इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, डॉ. रॉथ रस्ता, रामनगर, फडके रस्ता आणि मानपाडा रस्ता.
डोंबिवली पश्चिम: पंडित दिनदयाळ चौक, महात्मा गांधी रस्ता, घनश्याम गुप्ते रस्ता आणि ठाकुर्ली-कोपर उड्डाणपूल परिसर.
काय आढळले तपासणीत?
तपासणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अनेक चालकांकडे रिक्षेची वैध कागदपत्रे नव्हती, तर काहींचा विमा आणि पीयूसी (प्रदूषण नियंत्रण) कालबाह्य झाले होते. काही चालक गणवेशात नव्हते, तर अनेक रिक्षा वाहनतळाऐवजी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच उभ्या राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करत होते. या सर्व 50 हून अधिक रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.
