Pune News : नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; ११ ऑक्टोबरला घटस्थापना
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरासह उपनगरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
1 મિનિટ વાંચન

Pune News : नऊ दिवस देवीचा जागर; गरबा-दांडिया, भजन, कीर्तनासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; २० ऑक्टोबरला दसऱ्याचा उत्साह
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर - शारदीय नवरात्रोत्सवाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरासह उपनगरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा रविवारी (दि.११) घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार असून, सोमवारी (दि.१९)अष्टमी व नवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. मंगळवारी (दि.२०) विजयादशमी अर्थात दसरा साजरा होणार आहे.
घटस्थापनेसाठी सकाळचा मुहूर्त शुभ मानला जात असून, पुण्यात सकाळी ६.२७ ते ६.५८ हा प्रमुख मुहूर्त असल्याचे पंचांगात नमूद करण्यात आले आहे. तसेच सकाळी ११.५७ ते दुपारी १२.४४ या कालावधीत अभिजित मुहूर्तातही घटस्थापना करता येणार आहे. त्यामुळे मंदिरांसह सार्वजनिक मंडळांकडून घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची पूजा, महाआरती, भजन, कीर्तन, दुर्गासप्तशती पाठ, होमहवन यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर तरुणाईसाठी गरबा-दांडिया, महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक वेशभूषा कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अष्टमी व नवमीला कन्या पूजन, महाप्रसाद आणि विशेष आरती करण्यात येते.
नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर मंगळवारी (दि.२०)दसरा सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. शस्त्रपूजन, वाहनपूजन, सीमोल्लंघन आणि आपट्याची पाने वाटण्याच्या पारंपरिक कार्यक्रमांसह विविध ठिकाणी रावणदहन व सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.
यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार असून, तिथीच्या वृद्धीमुळे हे नवरात्र १० दिवसांचे आहे. ११ ऑक्टोबर रोजी रविवारी घरोघरी घटस्थापना केली जाईल.
नवरात्र १० दिवसांचे असल्याने देवीला रोज एक याप्रमाणे एकूण १० माळा अर्पण कराव्यात. संपूर्ण उपवास शक्य नसल्यास पहिल्या व शेवटच्या दिवशी किंवा किमान अष्टमीला उपवास करावा. पूजेदरम्यान नेहमीच्या देवांची पूजा बंद न करता ती नियमित करावी. नंदादीप अचानक विझल्यास घाबरून न जाता तो पुन्हा लावावा.
