आता यंत्रांनाही कुलरचा आधार!
वाढत्या पाऱ्यामुळे महावितरणची धडपड
1 મિનિટ વાંચન

वाढत्या पाऱ्यामुळे महावितरणची धडपड

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा पारा ४४ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, या कडाक्याच्या उन्हाचा चटका केवळ मानवी जीवाची लाहीलाही करत नसून, तांत्रिक यंत्रणेलाही त्याचा फटका बसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफार्मरचे तापमान धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने, गडचिरोली जिल्ह्यातील अल्लापल्ली येथील उपकेंद्रात यंत्रणेला थंड ठेवण्यासाठी महावितरणला चक्क कुलर लावावा लागला.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढल्याने विजेची मागणी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. अल्लापल्ली येथील १३२ केव्ही उपकेंद्रावर सध्या प्रचंड ताण आहे. वाढत्या लोडमुळे ट्रान्सफार्मरमधील ऑइल गरम होते, त्यातच बाहेरचे तापमान ४४ अंशांवर पोहोचल्याने यंत्रणेवर दुहेरी मारा होत आहे. ट्रान्सफॉर्मर मर्यादेपेक्षा जास्त तापल्यास त्यात तांत्रिक बिघाड होऊन स्फोट होण्याची किंवा वीजपुरवठा दीर्घकाळ ठप्प होण्याची भीती असते. ही आपत्कालीन स्थिती टाळण्यासाठी महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरच्या बाजूला एसी बसवला आहे.
येथील मुख्य ट्रान्सफार्मरला अतीगरम होण्यापासून वाचवण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना मोठे लोखंडी कुलर बसवण्यात आले आहेत. या कुलरच्या माध्यमातून सतत थंड हवा सोडून यंत्रणेचे तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. माणसांप्रमाणेच आता यंत्रांनाही कुलरचा आधार घ्यावा लागत असल्याने विदर्भातील उन्हाच्या तीव्रतेची भीषणता अधोरेखित होत आहे.
Now machines also have cooler support!
