महाराष्ट्र होरपळला!
अकोल्यात पारा ४५ अंशांच्या पार; पुण्यातही सूर्याचा प्रकोप
1 મિનિટ વાંચન

अकोल्यात पारा ४५ अंशांच्या पार; पुण्यातही सूर्याचा प्रकोप
पुढील ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा 'यलो अलर्ट’
पुणे: राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरे अक्षरशः तापली आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्याच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. अकोला हे ४५.१°C तापमानासह राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले असून, पुणे आणि परिसरातही तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

पुणेकर घामाघूम; लोहगावचा पारा ४३ अंशांच्या पुढे
पुणे शहरातही उष्णतेने उच्चांक गाठला आहे. पुणे वेधशाळेच्या नोंदीनुसार, शिवाजीनगर भागात ४१.६°C तापमानाची नोंद झाली, जे सरासरीपेक्षा ४.१ अंशांनी जास्त आहे. तर लोहगाव परिसरात पारा ४३.८°C वर पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आगामी १८ मे पर्यंत पुणे आणि आसपासच्या परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून तापमान ४१ ते ४२ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
राज्यात कुठे कशी आहे स्थिती?
मराठवाडा आणि विदर्भात उन्हाची तीव्रता सर्वाधिक आहे. जळगाव (४४.३°C), वर्धा (४३.८°C) आणि छत्रपती संभाजीनगर (४३.४°C) या शहरांमध्येही उष्णतेची लाट जाणवत आहे. कोकण आणि गोव्यातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली असून, मुंबईतही आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे.
पुढील ५ दिवसांचा अंदाज : ‘यलो अलर्ट’ जारी
हवामान विभागाने १२ ते १४ मे या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः विदर्भात ही स्थिती १६ मे पर्यंत कायम राहू शकते. यामुळे प्रशासनाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
