विरारच्या ग्लोबल सिटी परिसरात थरारक घटना; बंद फ्लॅटमध्ये तीन भाऊ-बहिणींचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
•"कुमार, दिपेश आणि खेवना मेहता यांनी जीवन संपवल्याचा संशय;"फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने प्रकार उघडकीस,पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू
1 મિનિટ વાંચન

•"कुमार, दिपेश आणि खेवना मेहता यांनी जीवन संपवल्याचा संशय;"फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने प्रकार उघडकीस,पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास सुरू
विरार :- पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील प्रसिद्ध ग्लोबल सिटी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील गार्डन एव्हेन्यू इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये तीन भाऊ-बहिणींचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आले आहेत. मृत व्यक्तींची नावे दिपेश मेहता (वय 52), कुमार मेहता (वय 50) आणि त्यांची बहीण खेवना मेहता (वय 48) अशी आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहता कुटुंबाचा हा फ्लॅट गेल्या काही दिवसांपासून बंद होता. गुरुवारी अचानक फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्यामुळे स्थानिक रहिवाशांना संशय आला. नागरिकांनी तात्काळ याबद्दल पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद दरवाजा तोडला असता, घरात दिपेश, कुमार आणि खेवना या तिघांचेही मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासानुसार, आर्थिक अडचणी आणि आजारपणाला कंटाळून या तिघांनी विषप्राशन करून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मृत्यूआधी रेकॉर्ड केला व्हिडिओ; पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास
या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही भावंडांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी या तिघांनी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला होता, ज्यामध्ये त्यांनी आपल्या आर्थिक व कौटुंबिक अडचणींचा उल्लेख केल्याचे समजते.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे विरार शहरात मोठी शोककळा पसरली आहे. पोलीस या व्हिडिओची तपासणी करत असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे अधिकृत व अचूक कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
