Thane Crime News : देशी दारू दुकानाचा परवाना मिळवून देण्याच्या आमिषाने 1 कोटी 2 लाखांची फसवणूक; भिवंडी गुन्हे शाखेकडून आरोपीला बेड्या
•परवाना देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला घातला गंडा; शिळ-डायघर परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 5 लाखांची रोकड जप्त
1 min read

•परवाना देण्याच्या नावाखाली व्यावसायिकाला घातला गंडा; शिळ-डायघर परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 5 लाखांची रोकड जप्त

ठाणे, भिवंडी :- भिवंडी येथील एका व्यावसायिकाला देशी दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1 कोटी 2 लाख 17 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-2, भिवंडी पथकाने तातडीने कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. अटकेत असलेल्या आरोपीकडून पोलिसांनी ५ लाख रुपयांची रोकड जप्त केली असून या कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
विश्वासाचा गैरफायदा घेत उकळली मोठी रक्कम
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी परिसरात देशी दारू दुकानाचा परवाना मिळवून देण्याचे आश्वासन देऊन आरोपीने संबंधित व्यावसायिकाचा पूर्ण विश्वास संपादन केला होता. त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने त्याच्याकडून एकूण 1 कोटी 2 लाख 17 हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, प्रदीर्घ कालावधी उलटूनही परवाना न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले, ज्यानंतर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली.
शिळ-डायघर परिसरातून आरोपी जेरबंद
तक्रार प्राप्त होताच ठाणे गुन्हे शाखा युनिट-2, भिवंडीच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून शिळ-डायघर परिसरातून आरोपीचा माग काढून त्याला ताब्यात घेतले. या फसवणूक प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच उकळलेली उर्वरित रक्कम कुठे गुंतवण्यात आली आहे, याबाबत ठाणे गुन्हे शाखेकडून अधिक तपास सुरू आहे.


