Skip to content

Thane Crime News : मुंब्रा वाहतूक कक्षातील 35 ते 40 अधिकारी-कर्मचारी नियंत्रण कक्षात संलग्न; ट्रॅफिक वार्डन 5 हजारांच्या लाचेप्रकरणी जाळ्यात आल्यानंतर कारवाई

• वाहन परवाना परत देण्यासाठी मागितली होती 5 हजारांची लाच; वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्याकडे मुंब्रा वाहतूक कक्षाची जबाबदारी

PS
Piyusha Sawant

2 min read

35 to 40 officers and personnel from the Mumbra Traffic Unit have been attached to the control room; the action follows the arrest of a traffic warden in a bribery case involving a sum of ₹5,000.
Mumbra Bribe News

ठाणे / मुंब्रा :- जप्त केलेला वाहन परवाना परत मिळवून देण्यासाठी वाहनचालकाकडे 5000 रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक साहाय्यक (ट्रॅफिक वार्डन) अरबाज शेख याच्यावर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केल्यानंतर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंब्रा वाहतूक कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अहेर यांच्यासह संपूर्ण कक्षातील सुमारे 35 ते 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. या कारवाईमुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मद्यधुंद वाहन चालविल्याप्रकरणी परवाना केला होता जप्त; न्यायालयात 10 हजारांचा दंड भरूनही परवान्यासाठी लाचेची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील जुन्या बंद टोलनाक्याजवळ मद्यप्राशन करून वाहन चालवल्याप्रकरणी मुंब्रा वाहतूक कक्षाच्या पथकाने संबंधित वाहनचालकावर कारवाई करत त्याचा वाहन परवाना जप्त केला होता. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी वाहनचालकाने ठाणे न्यायालयात 10,000 रुपयांचा दंड भरला.

आपला जप्त केलेला वाहन परवाना परत मिळवण्यासाठी हा चालक २ नोव्हेंबर रोजी मुंब्रा वाहतूक कक्षाच्या कार्यालयात गेला. तेथे साध्या वेशातील वाहतूक साहाय्यक अरबाज शेख (वय 27) याच्याकडे दंड भरल्याची पावती सादर करून त्याने परवाना परत करण्याची मागणी केली. मात्र, परवाना परत देण्याच्या मोबदल्यात शेख याने 5000 रुपयांची लाच मागितली. या प्रकारानंतर तक्रारदाराने 4 नोव्हेंबर रोजी ठाणे एसीबीकडे तक्रार नोंदवली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी मुंब्रा वाहतूक कार्यालयात सापळा रचून अरबाज शेख याला लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्याकडे मुंब्रा वाहतूक कक्षाची सूत्रे; इतर विभागांतून कर्मचारी वर्ग नियुक्त

ट्रॅफिक वार्डनवर झालेल्या लाचखोरीच्या कारवाईनंतर बुधवारी ठाणे पोलिसांनी धडक पाऊल उचलत मुंब्रा वाहतूक कक्षातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल अहेर यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षात संलग्न केले. साधारणतः एका वाहतूक कक्षात 35 ते 40 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात.

दरम्यान, मुंब्रा वाहतूक कक्षाचे कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेतील प्रशासन विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरी मोरे यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, वाहतूक शाखेतील विविध विभागांमधून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुंब्रा वाहतूक कक्षात नवीन नेमणूक करण्यात आली आहे.

Share