Skip to content

Supriya Sule : सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात; सुनेत्रा पवारांची माफी मागत म्हणाल्या, ‘व्हॉट इज प्रॉब्लेम?’

रोहित पवारांच्या वक्तव्यावरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुप्रिया सुळेंची मध्यस्थी करण्याची भूमिका

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

Supriya Sule मुंबई, : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्याविरोधात अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांची बाजू मांडत सुनेत्रा पवार यांची दिलगिरी व्यक्त केली. 'व्हॉट इज प्रॉब्लेम? त्यांना विषय वाढवायचा असेल तर मला त्यात रस नाही,' अशा शब्दांत त्यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली.

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी गुरुवारी सुनेत्रा पवार यांच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याच्या क्षमतेवर भाष्य केले होते. 'सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम करता येत नाही. पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिक ताकद देण्याची गरज आहे किंवा पुण्याला कडक पालकमंत्री द्यावा,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विधानानंतर अजित पवार गटातील नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रोहित पवार यांनी कालच आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनी सॉरी म्हटल्यानंतर पुन्हा आंदोलन करण्याची गरज काय? आपण सर्वांनी एकाच ताटात जेवण केले आहे. कदाचित रोहितने माफी मागितल्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचली नसेल. रोहितकडून अनावधानाने काही चुकीचे शब्द गेले असतील, तर त्याने त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा विषय इथेच संपवावा, असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सुनेत्रा पवार या माझ्या मोठ्या भावाच्या पत्नी आहेत. पवार कुटुंबात ज्या संस्कारांमध्ये मी वाढले, तिथे वयाने आणि पदाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर माफी मागण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. सुनेत्रा पवार यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी रोहितच्या वतीने हात जोडून दिलगिरी व्यक्त करते. हे आमच्या पक्षाचे धोरण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिलिमिटेशन विधेयकावरही भाष्य

दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबतही सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. संजय राऊत हे माझे मोठे भाऊ आहेत. ते महाराष्ट्राचे आणि देशाचे मोठे नेते आहेत. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी जे वाटले ते मोकळेपणाने मांडले, असे त्या म्हणाल्या.

संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत बोलताना सुळे यांनी अद्याप अधिवेशनाचा अधिकृत अजेंडा जाहीर झालेला नसल्याचे सांगितले. अजेंडा समोर आल्यानंतरच त्यावर भाष्य करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रोहित पवारांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांमधील मतभेद पुन्हा चर्चेत आणणारा ठरत आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror