Skip to content

Solapur: सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा एकहाती विजय! १९ पैकी १८ जागांवर सहकार विकास पॅनलचा झेंडा; मोहिते-पाटलांना मोठा धक्का

जयकुमार गोरे विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपची बाजी; अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरसचा गड राखला, मनीष देशमुखांचा २८ मतांनी विजय

Smita Kulkarni
Smita Kulkarni

3 min read

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Solapur: सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी तब्बल १८ जागांवर विजय मिळवत भाजपने बँकेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी विजय मिळवत मोहिते-पाटील गटाचा बालेकिल्ला राखला आहे.

या निवडणुकीकडे केवळ सहकारी बँकेची निवडणूक म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिले जात होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार विकास पॅनल आणि मोहिते-पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमध्ये थेट लढत झाली. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालाकडे लागले होते. अखेर २७ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालात भाजपप्रणित पॅनलने एकतर्फी बाजी मारली.

१० जागांवर बिनविरोध, उर्वरित ९ जागांसाठी निवडणूक

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी सहकार विकास पॅनलचे १० उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित नऊ जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ८६.९४ इतकी होती. अक्कलकोट मतदारसंघात १०० टक्के मतदानाची नोंद झाली होती.

मतमोजणीनंतर उर्वरित नऊ जागांपैकी आठ जागांवर सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला, तर एका जागेवर मोहिते-पाटील गटाला यश मिळाले. त्यामुळे आधीच्या १० बिनविरोध जागांसह भाजपप्रणित पॅनलने एकूण १८ जागा जिंकल्या.

मनीष देशमुख विरुद्ध अमोल शिंदे; अवघ्या २८ मतांनी निकाल

या निवडणुकीतील सर्वाधिक चुरशीची लढत बँक आणि पतसंस्था मतदारसंघात पाहायला मिळाली. भाजपचे मनीष देशमुख आणि शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा अवघ्या २८ मतांनी पराभव केला. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल विशेष चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान, निकालानंतर भाजप समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला. या विजयामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात भाजपप्रणित गटाचे राजकीय वजन वाढले आहे. तर मोहिते-पाटील गटाला मिळालेल्या एका जागेमुळे त्यांच्या राजकीय रणनीतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सहकार विकास पॅनलचे बिनविरोध विजयी उमेदवार

1. राजेंद्र राऊत – बार्शी विविध कार्यकारी सोसायटी

2. प्रशांत परिचारक – पंढरपूर विविध कार्यकारी सोसायटी

3. विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विविध कार्यकारी सोसायटी

4. सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विविध कार्यकारी सोसायटी

5. यशराज शिंदे – माढा विविध कार्यकारी सोसायटी

6. श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विविध कार्यकारी सोसायटी

7. पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विविध कार्यकारी सोसायटी

8. शंभूराजे जगताप – करमाळा विविध कार्यकारी सोसायटी

9. सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विविध कार्यकारी सोसायटी

10. अजिंक्यराणा पाटील – ओबीसी प्रवर्ग

निवडणुकीत विजयी झालेले सहकार विकास पॅनलचे उमेदवार

1. बाबासाहेब देशमुख – सांगोला विविध कार्यकारी सोसायटी

2. अर्चना घाडगे – महिला मतदारसंघ

3. शामल बागल – महिला मतदारसंघ

4. राजेंद्र बंदीछोडे – इतर भटक्या जमाती

5. रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया

6. मनीष देशमुख – बँक व पतसंस्था

7. सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास

8. महादेव कांबळे – अनुसूचित जाती

स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचा एकमेव विजयी उमेदवार

अर्जुनसिंह मोहिते-पाटील – माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror