Skip to content

Sharad Pawar ः शरद पवारांना डिहायड्रेशनचा त्रास, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘बाबा ऐकतच नाहीत’

डॉक्टरांकडून प्रवास कमी करण्यासह विश्रांतीचा सल्ला; प्रकृती स्थिर असल्याची रोहित पवारांची माहिती

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

ज्येष्ठ नेते शरद पवार
Senior Leader Sharad Pawar

मुंबई, महाराष्ट्र मिरर – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डिहायड्रेशनचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. डॉक्टरांनी पवार यांना प्रवास कमी करण्यासह पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, कामात सतत व्यस्त राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते विश्रांती घेत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच सुप्रिया सुळे यांनी सुरू असलेली पक्षाची बैठक अर्धवट सोडून ब्रीच कँडी ब्रीच कँडी इन इंगि्लश

(Breach Candy )रुग्णालय गाठले. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत वडिलांच्या प्रकृतीची माहिती दिली. ‘डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. सध्या त्यांची तब्येत ठीक आहे. सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून आभार,’ असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. डिहायड्रेशनच्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली शरद पवारांची भेट

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही, असे पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. भेटीदरम्यान शरद पवार जेवण करत होते. त्यामुळे आपण त्यांच्याशी फार वेळ बोललो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror