Ravindra Dhangekar : शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांचा जळजळीत इशारा"…तर नवनाथ बन यांना पुणे आणि महाराष्ट्रात फिरू देणार नाही"
भाजप प्रवक्त्याच्या टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; 'नवनाथ बन हा पगारी माणूस असून तुकड्यावर जगतोय' अशा शब्दांत काढली वाणवा."
1 min read

पुणे :- विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन आणि शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा आता टोकाला पोहोचला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र धंगेकर यांनी नवनाथ बन यांच्यावर अत्यंत घणाघाती शब्दांत हल्लाबोल केला.
"नवनाथ बन हे केवळ फोटो काढून दाखवणारे आणि पगारावर काम करणारे व्यक्ती आहेत," असा टोला लगावत धंगेकर म्हणाले की, "जर नवनाथ बन माझ्या लेव्हलला खाली उतरले, तर मी त्यांना पुण्यातच काय पण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही." बन हे नेहमीच कोणाच्यातरी तुकड्यावर जगतात, तर आपण कधीही कुणाच्या मेहरबानीवर जगत नाही, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.
भाजपमध्ये लायकीचे लोक नाहीत का? धंगेकरांचा सवाल
या वादानरम्यान धंगेकरांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही ताशेरे ओढले. भाजपमध्ये इतर सक्षम आणि पात्र लोक असताना अशा व्यक्तीला पक्षात स्थान देऊन मोठे कसे केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, महायुतीत सर्व काही आटोक्यात नसल्याचे सांगत भाजपमधील अनेक नेत्यांनाही अंतर्गत असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला.
यापूर्वी नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांवर टीका करताना त्यांना 'माकडछाप' असे संबोधले होते, ज्याला आता धंगेकरांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. या शाब्दिक युद्धामुळे महायुतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दोन्ही बाजूंमधील दुरावा वाढल्याचे दिसून येत आहे.


