Skip to content

Raj Thackeray : राज ठाकरेंनी उलगडला 37 वर्षांपूर्वीचा 'तो' खास किस्सा; 'सुख पाहता'च्या निमित्ताने व्यक्त केल्या भावना

•स्वतः रेखाटलेले मुखपृष्ठ आणि यशवंत दत्तांचा अभिनय; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

V
Vivek

2 min read

Raj Thackeray : राज ठाकरेंनी उलगडला 37 वर्षांपूर्वीचा 'तो' खास किस्सा; 'सुख पाहता'च्या निमित्ताने व्यक्त केल्या भावना

•स्वतः रेखाटलेले मुखपृष्ठ आणि यशवंत दत्तांचा अभिनय; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या रोखठोक राजकारणासोबतच त्यांच्यातील संवेदनशील कलाकारासाठीही ओळखले जातात. नुकतेच आपल्या घरातील ग्रंथालयात पुस्तके चाळत असताना त्यांच्या हाती ‘सुख पाहता’ या नाटकाचे पुस्तक लागले आणि त्यांनी 37 वर्षांपूर्वीच्या एका सोनेरी आठवणीला उजाळा दिला. या नाटकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ स्वतः राज ठाकरे यांनी रेखाटले होते, हा रंजक इतिहास त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडला आहे.

Photos · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

वसंत कानेटकरांची 'ती' इच्छा आणि राज ठाकरेंची कलाकृती

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक 'सुख पाहता' या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहित नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं !

घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की मी वसंत कानेटकरांचं 'सुख पाहता' नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.
असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.

पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकांत यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.

एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेंव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.

आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं.

मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…

राज ठाकरे ।

हेही वाचा: Maharashtra Budget Session 2026 : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

Share