PUNE NEWS : 'हरित पुणे, समृद्ध पुणे' मोहिमेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच उडवला फज्जा
वृक्ष लागवडीच्या आयुक्तांच्या आवाहनाला महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून हरताळ
3 min read

वृक्ष लागवडीच्या आयुक्तांच्या आवाहनाला महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून हरताळ
महत्वाचे मुद्दे
निलेश राऊत
पुणे PUNE NEWS: जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच ५ जून रोजी पुणे महापालिकेने 'हरित पुणे, समृद्ध पुणे' ही मोहीम हाती घेतली. यावेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी मोहिमेत पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना एक वृक्ष लावणे, तसेच दोन वर्षे संगोपन करणे बंधनकारक केले होते. पण वृक्ष लागवडीच्या आयुक्तांच्या आवाहनाला महापालिका कर्मचारी अधिकारी यांच्याकडून हरताळ फासण्यात आला आहे.PUNE NEWS

या मोहिमेत प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याने एक वृक्ष लावणे आणि त्याचे दोन वर्षे संगोपन करून तो जिवंत राहील, याची जबाबदारी त्यांच्यावर होती. लावलेल्या झाडाचे स्थान, प्रजाती आणि छायाचित्रांसह माहिती वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आज जून महिना संपत आला तरी आवाहनाच्या २५ दिवसानंतर ही अद्याप एकाही कर्मचाऱ्याने अथवा अधिकाऱ्याने असा अहवाल सादर केला नसल्याने मोहीम कागदावरच राहिल्याचे दिसत असून, हरित पुणे, समृद्ध पुणे, मोहिमेचा अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच फज्जा उडविल्याचे स्पष्ट झाले आहे.PUNE NEWS
७२७ नागरिकांनी केले वृक्षारोपण
वाढते तापमान, घटते हरित क्षेत्र आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेने 'हरित पुणे, समृद्ध पुणे' ही मोहीम हाती घेतली. ५ जून रोजी या अभियानाचा प्रारंभ ही झाला. दरवर्षी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी वृक्ष प्राधिकरणामार्फत पावसाळ्यात वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन केले जाते. त्यात पालिकेने पुणेकरांनाही पावसाळ्यात वृक्ष लागवडीचे आवाहन केले होते. या आवाहनाला साथ देत त्याच दिवशी ७२७ नागरिकांनी वृक्षारोपण केले व त्याची नोंद महापालिकेच्या संकेतस्थळावर केली.
२० हजार देशी झाडांच्या रोपांची विक्री झाली
तर उद्यान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या पाच रुपयांत पाच-सहा वर्षे वाढ झालेली देशी झाडांच्या २० हजार रोपांची ५ जून ते २८ जून पर्यंत विक्री झाली आहे. पण एकीकडे पुणेकर पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे पालिका स्वतःच्या मोहिमेकडे पाठ फिरवत आहे. आजमितीला पुणे महापालिकेत कायम व कंत्राटी असे मिळून सुमारे १८ हजार कर्मचारी आहे. पण यातील एकानेही महापालिका आयुक्तांच्या आवाहना नंतर २५ दिवस उलटले तरी प्रतिसाद दिलेला नाही.PUNE NEWS
मोहिमेचे गांभीर्यच नाही, ना देणे ना घेणे
हरित पुणे, समृद्ध पुणे, मोहिमेबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्याशी महाराष्ट्र मिररने संपर्क साधला असता त्यांनी, महापालिकेच्या किती कर्मचारी व अधिकारी यांनी वृक्षारोपण केले याचा तपशील महापालिकेच्या सांख्यिकी विभागाला गोळा करण्यास सांगितला असल्याचे सांगितले.PUNE NEWS
तर सांख्यिकी विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उद्यान विभागाने असे कोणतेही पत्र आम्हाला दिले नसल्याचे सांगितले. त्यामुळे हरित पुणे, समृद्ध पुणे, मोहिमेचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना किती गांभीर्य आहे याची प्रचिती येत आहे. यातून ही मोहीम केवळ कागदावरच राहिली असल्याचे दिसून येत असून तिचे महापालिकेतील कोणालाही ना देणे ना घेणे असल्याचे दिसून येत आहे.PUNE NEWS
अहवाल मागविले, सत्य परिस्थिती आयुकांकडे सादर करणार
उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले, "महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांना वृक्ष लागवडीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आता सर्वांकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कोणाचाही अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सर्व विभागांकडून पुन्हा एकदा माहिती मागविण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली. हे अहवाल आल्यावर महापालिकेच्या किती कर्मचारी-अधिकारी यांनी वृक्ष लागवड केली याची सत्य परिस्थिती आयुकांकडे सादर करण्यात येईल."
PUNE NEWS


