PM Narendra Modi: डिलिमिटेशन विधेयकावर मोदींचं सूचक ट्वीट; जुना व्हिडीओ पोस्ट करत विरोधकांना इशारा
महिला आरक्षणाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करणार; योग्य वेळेची प्रतीक्षा असल्याचं मोदींचं विधान
2 min read

PM Narendra Modi :नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून सोशल मीडियावर सूचक विधान केले आहे. आपल्या जुन्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. ‘आम्ही नारीशक्तीला दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत,’ असे मोदी यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांचे ट्वीट चर्चेत आले आहे. यापूर्वी संसदेत विधेयकाला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्यानंतर मोदी यांनी देशाला संबोधित करताना काँग्रेससह विरोधी पक्षांवर टीका केली होती. त्याच भाषणातील काही भाग त्यांनी आता पुन्हा पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात की, देशातील नारीशक्तीचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, यासाठीची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेक महिलांनी महिला आरक्षणाचा मुद्दा आपल्यासमोर मांडला आहे. महिला आरक्षणाच्या मार्गात येणारे प्रत्येक संकट दूर करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘महिला आरक्षणाच्या आड येणारे प्रत्येक संकट आम्ही मोडून काढू. आमचा विश्वास कायम आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे पक्ष महिला आरक्षण रोखू शकणार नाहीत. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा आहे,’ असा संदेश मोदी यांनी या व्हिडीओतून दिला आहे.
दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर विविध राजकीय पक्षांच्या भूमिकांकडे लक्ष लागले आहे. काही विरोधी पक्षांकडून विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत मिळत असताना, इंडिया आघाडीतील पक्षांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. या विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात या विधेयकावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Maharashtra Mirror




