Mallikarjun Kharge:डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजपला कायमस्वरूपी सत्ता हवी; संविधान बदलण्याचा डाव असल्याचा खरगेंचा आरोप
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; एससी-एसटींच्या हितालाही बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त
2 min read

Mallikarjun Kharge:नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारला देशात कायमस्वरूपी सत्ता मिळवायची असून, त्यासाठी डिलिमिटेशन विधेयकाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून संसदेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा आणि भविष्यात देशाचे संविधान बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. इंडिया आघाडीच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी या विधेयकाबाबत चिंता व्यक्त केली.
खरगे यांच्या मते, डिलिमिटेशन विधेयक हे केवळ मतदारसंघांची पुनर्रचना करण्यापुरते मर्यादित नसून, त्याचे दूरगामी राजकीय परिणाम होऊ शकतात. भाजपला दीर्घकाळ सत्तेत राहण्यासाठी लोकशाही व्यवस्थेवरच परिणाम करणारे बदल करायचे असल्याचा आरोप त्यांनी केला. चीनमधील हात वर करून निर्णय घेण्याच्या पद्धतीचा संदर्भ देत त्यांनी लोकशाही प्रक्रियेबाबतही चिंता व्यक्त केली.
या विधेयकामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या राजकीय हितसंबंधांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही खरगे यांनी व्यक्त केली. भाजपची विचारधारा मनुस्मृतीच्या दिशेने जाणारी असून, संविधानातील समानता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी टीकाही त्यांनी केली.
यापूर्वीही भाजपने लोकसभेत दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात यश आले नाही. आता डिलिमिटेशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा बहुमत मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खरगे यांनी केला. या विधेयकाच्या नावाखाली महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे केला जात असला, तरी महिला आरक्षणाची अंमलबजावणी सध्याच्या लोकसभा सदस्यसंख्येतही करता येऊ शकते, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
दरम्यान, लोकशाही, संविधान आणि संघराज्य व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी इंडिया आघाडीतील पक्ष या विधेयकाला विरोध करणार असल्याचे खरगे यांनी स्पष्ट केले. आगामी संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी एकत्रित रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra Mirror




