Skip to content

कामाठीपुरा पुनर्विकासाला गती; प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर देण्याचा संकल्प

स्व. मुरलीभाई देवरा यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न; मिलिंद देवरा यांचा रहिवाशांशी संवाद

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min readUpdated:

खासदार मिलिंद देवरा
खासदार मिलिंद देवरा

मुंबई, महाराष्ट्र मिरर : मुंबईतील ऐतिहासिक कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने कामाठीपुरा विकास समितीच्या वतीने घरमालकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला उपस्थित राहून खासदार मिलिंद देवरा यांनी रहिवाशांशी संवाद साधला. पुनर्विकास प्रकल्पाची माहिती घेताना रहिवाशांचे प्रश्न, अपेक्षा आणि अडचणी जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला.

कामाठीपुऱ्यातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे आणि कायमस्वरूपी घर मिळावे, हे आपले वडील दिवंगत मुरलीभाई देवरा यांचे स्वप्न होते. त्यांच्या या स्वप्नपूर्तीच्या प्रवासात योगदान देता येत असल्याचा मनस्वी आनंद आणि अभिमान वाटत असल्याची भावना मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली. पुनर्विकासाच्या माध्यमातून परिसरातील रहिवाशांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा असलेले घर मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले. शासनाच्या सहकार्यामुळे कामाठीपुराच्या पुनर्विकासाला दिशा मिळत असून, हा प्रकल्प रहिवाशांच्या हिताला प्राधान्य देणारा ठरावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पामध्ये केवळ जुन्या इमारतींचे नूतनीकरण न करता संपूर्ण परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यावर भर दिला जात आहे. आधुनिक नागरी सुविधा, चांगल्या दर्जाची घरे, अंतर्गत रस्ते, मोकळ्या जागा आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

रहिवाशांचे हित, त्यांच्या पुनर्वसनाबाबत पारदर्शकता आणि कामाठीपुराचा सर्वांगीण विकास या बाबींना प्राधान्य देऊन पुनर्विकास प्रकल्प पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कामाठीपुरातील प्रत्येक कुटुंबाला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्यासाठी हक्काचे घर मिळावे, हाच या विकासप्रक्रियेचा मुख्य उद्देश असल्याचे मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror