Ekanth Shinde : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न; बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर करण्याचे विठुरायाला साकडे
• पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी विठ्ठल-रुक्मिणीला सुवर्णहार अर्पण; नांदेडच्या शेतकरी दाम्पत्याला ‘मानाचा वारकरी’ बहुमान
2 min read

पंढरपूर / सोलापूर :- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वावर शनिवारी (21 नोव्हेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी वेदमंत्रांच्या जयघोषात हा पूजा विधी पार पडला असून, यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला सुवर्णहार अर्पण करण्यात आला.
मानाचा वारकरी बहुमान आणि शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये”; केंद्र व राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही
यंदाच्या शासकीय महापूजेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचेगाव खुर्द येथील शेतकरी दाम्पत्य सुधाकर दशरथ शिंदे आणि प्रणिता सुधाकर शिंदे यांना ‘मानाचा वारकरी’ म्हणून सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. गेल्या 11 वर्षांपासून अखंड कार्तिकी वारी करणाऱ्या या दाम्पत्यासोबत एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नीने पांडुरंगाचे विधिवत पूजन केले.
महापूजेनंतर संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चिंता व्यक्त करत विठुरायाला साकडे घातले. ते म्हणाले की, “राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे असून, कोणत्याही शेतकऱ्याने वेडेवाकडे पाऊल उचलू नये. राज्यातील बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर होऊन चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी-समाधानी होऊ दे.”
पंढरी नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली; 28 नोव्हेंबरपर्यंत 24 तास दर्शन व्यवस्था
10 ते 12 लाख भाविक दाखल होण्याचा अंदाज; पदस्पर्श दर्शन दररोज 22 तास 15 मिनिटे, तर मुखदर्शन अखंड 24 तास सुरू राहणार
कार्तिकी वारीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त संपूर्ण पंढरी नगरी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात दुमदुमून गेली आहे. राज्यभरातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज मंदिर प्रशासनाने वर्तवला आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता लांबून येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विठुरायाचे सुलभ दर्शन मिळावे, यासाठी मंदिर प्रशासनाने येत्या 28 नोव्हेंबरपर्यंत मंदिरात 24 तास दर्शन व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार, 28 नोव्हेंबरपर्यंत श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन दररोज 22 तास 15 मिनिटे, तर मुखदर्शन अखंड 24 तास सुरू राहणार आहे.




