Skip to content

Auto-rickshaw : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती येणार रिक्षाचे स्टेअरिंग; पाच वर्षांत एक लाख रिक्षांचे वाटप

९० टक्के बँक कर्ज, १० टक्के अनुदान; लॉटरी पद्धतीने होणार लाभार्थ्यांची निवड

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

Auto-rickshaw
Auto-rickshaw

Auto-rickshaw मुंबई, महाराष्ट्र मिरर – दुष्काळ, शेतीमालाला मिळणारा कमी बाजारभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पर्यायी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमधील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष रिक्षा वाटप योजना आखली आहे. या योजनेंतर्गत पुढील पाच वर्षांत म्हणजेच २०२७ ते २०३१ या कालावधीत एक लाख प्रवासी रिक्षांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली.

दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप

‘अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप करण्याचे नियोजन आहे. रिक्षा खरेदीसाठी वाहनाच्या एकूण किमतीच्या ९० टक्के रक्कम बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर उर्वरित १० टक्के रक्कम कल्याणकारी मंडळाकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) शुल्क माफ करण्याचेही नियोजन आहे.

लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड

राज्यातील ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील पात्र अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे. यासाठी इच्छुकांना अर्ज करावा लागणार आहे. उपलब्ध रिक्षांच्या तुलनेत अर्जांची संख्या अधिक असल्यास म्हाडाच्या घरांच्या सोडतीप्रमाणे संगणकीय लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. योजनेतून मिळालेली रिक्षा संबंधित जिल्ह्यातच चालवणे बंधनकारक असणार आहे.

९ फेब्रुवारीपासून योजनेला सुरुवात करण्याचे नियोजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ९ फेब्रुवारी २०२७ पासून या योजनेची सुरुवात करून पात्र शेतकऱ्यांना रिक्षांच्या चाव्या देण्याचे नियोजन असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मात्र, योजनेचा प्रस्ताव अद्याप राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, कर्जमंजुरी आणि अनुदानासंदर्भातील अटी अधिकृत शासन निर्णयानंतर स्पष्ट होणार आहेत.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror