प्लॉट विक्रीच्या बहाण्याने २.७० लाखांना लुटले
नोटराईज दस्तऐवज बनवून लावला चुना
1 min read

नोटराईज दस्तऐवज बनवून लावला चुना
पिंपरी: मावळ तालुक्यातील डोणे येथील प्लॉट विकण्याचे आमिष दाखवून नोटराईज दस्तऐवज बनवून एका व्यक्तीची २ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २३ जुलै २०१९ ते ९ मे २०२६ या कालावधीत मारुंजी येथील गुडविन सिटी लँडमार्क डेव्हलपर्सच्या कार्यालयात घडली.

याप्रकरणी जितीन बाळू भोसले (३९, माण, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पूर्णचंद्र स्वैन (अशोक नगर, पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मौजे डोणे (ता. मावळ) येथील प्लॉट क्रमांक २८१ हा ४ लाख ९८ हजार २४० रुपयांना विकण्याचे ठरवले होते. फिर्यादीने वेळोवेळी २ लाख ७० हजार रुपये चेकद्वारे दिले. त्यानंतर आरोपीने नोटराईज 'एमओयू' केला, मात्र त्यात जाणूनबुजून सर्व्हे नंबर न टाकता केवळ प्लॉट नंबरचा मोघम उल्लेख केला. पैसे घेऊनही प्लॉटचे खरेदीखत करून दिले नाही किंवा रक्कमही परत केली नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


