Skip to content

हिवाळ्यात जायकवाडी, सुखना परिसरातील पक्ष्यांची संख्या घटली

एल निनोचा प्रभाव, पाण्याची कमतरता आणि प्रदूषणाचा फटका; हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची पाठ

Smita Kulkarni
Smita Kulkarni

2 min read

पक्ष्यांची संख्या घटली

छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र मिरर : यंदाच्या हिवाळ्यात जायकवाडी धरण आणि सुखना प्रकल्प परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे निरीक्षण समोर आले आहे. एल निनोचा प्रभाव, जलाशयातील कमी झालेला पाणीसाठा आणि वाढते प्रदूषण यामुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर परिणाम झाला आहे. दरवर्षी हिवाळ्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून या परिसरात दाखल होणाऱ्या परदेशी पाहुण्या पक्ष्यांची संख्या यंदा अपेक्षेपेक्षा कमी असल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

या परिसरात दरवर्षी सुमारे १८४ प्रकारचे पक्षी आढळतात. यामध्ये जवळपास १०० स्थानिक, तर ८४ परराज्यांतून आणि परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश असतो. युरोपियन देशांमध्ये हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर तेथील पक्षी उबदार हवामान, मुबलक खाद्य आणि सुरक्षित अधिवासाच्या शोधात भारताकडे स्थलांतर करतात. जायकवाडी धरण हे अशा स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवासस्थान मानले जाते. मात्र, यंदा कमी पाणीसाठा, जलपर्णीचा वाढता प्रादुर्भाव आणि पाण्यातील प्रदूषणामुळे या पक्ष्यांच्या आगमनावर मर्यादा आल्या आहेत.

यंदा सायबेरिया, मध्य आशिया आणि युरोपमधून कुकरी गरुड, भोरडी मैना, चमकदार शराटी, नीलपंख, युरोपियन रोलर आणि मानमोड्या यांसारखे काही स्थलांतरित पक्षी परिसरात दाखल झाले आहेत. मात्र, दरवर्षी जलाशयांवर दिसणारे पाणपक्ष्यांचे मोठे थवे यंदा दिसत नाहीत. जलाशयांमध्ये मोजक्याच पक्ष्यांची उपस्थिती असून समुद्री बगळा आणि मोर बगळा हे पक्षी प्रामुख्याने दिसत आहेत.

केवळ स्थलांतरित पक्ष्यांचीच नव्हे, तर स्थानिक पक्ष्यांची संख्याही घटल्याचे चित्र आहे. उघड्या चोचीचा करकोचा, रंगीत करकोचा आणि खंड्या यांसारख्या पक्ष्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पाणथळ जागांचे घटते क्षेत्र, खाद्याची कमतरता आणि प्रदूषण यांचा पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जायकवाडी आणि सुखना परिसरातील जैवविविधता टिकवण्यासाठी जलाशयांचे प्रदूषण रोखणे, पाणथळ जागांचे संवर्धन करणे आणि पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आवश्यक बनले आहे.

Share
Smita Kulkarni

Reporter-Subeditor

Maharashtra Mirror