सोन्याच्या दरात मोठी घसरण; वर्षभरात तब्बल ४० हजारांनी स्वस्त!
डॉलरची मजबुती, जागतिक घडामोडी आणि नफावसुलीचा परिणाम; सोन्यात चिनी पावडरच्या भेसळीच्या चर्चेनेही चिंता वाढली
2 min read

मुंबई ः गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असून, अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरातील दरांची तुलना केली असता सोनं तब्बल ४० हजार रुपयांनी स्वस्त झाल्याचे चित्र समोर आले आहे. सोन्याच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष बाजारातील घडामोडींकडे लागले आहे. सोन्याचे दर नेमके का घसरत आहेत? ही घसरण आणखी किती काळ कायम राहणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच सोन्यात चिनी पावडरचा वापर करून भेसळ केली जात असल्याच्या चर्चेमुळे सोन्याच्या शुद्धतेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
सोन्याचे दर घसरण्यामागे नेमकी कारणे काय?
सोन्याच्या दरातील घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील अनेक घडामोडी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये होत असल्याने डॉलर मजबूत झाल्यास इतर चलनांमध्ये सोन्याची खरेदी महाग पडते. परिणामी मागणीवर परिणाम होऊन सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता असते.
याशिवाय अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक धोरणाबाबत असलेली अनिश्चितताही सोन्याच्या बाजारावर परिणाम करत आहे. व्याजदर वाढण्याचे संकेत मिळाल्यास गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी व्याज मिळवून देणाऱ्या पर्यायांकडे वळू शकतो. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती, जागतिक आर्थिक घडामोडी आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याच्या खरेदीबाबत घेतली जाणारी सावध भूमिका यांचाही दरांवर परिणाम होत आहे.
गुंतवणूकदारांकडून नफावसुली; दरांवर दबाव
यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केली. याला बाजाराच्या भाषेत नफावसुली म्हटले जाते. मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. सोन्या-चांदीच्या बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचाही परिणाम दिसून येत आहे.
दरम्यान, भविष्यात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जातील, याबाबत सध्या निश्चित अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती तीव्र झाल्यास किंवा अमेरिकन डॉलर कमजोर झाल्यास सोन्याच्या दरात पुन्हा तेजी येऊ शकते, अशी शक्यता सोन्याचे व्यापारी कुमार जैन यांनी व्यक्त केली.
सोन्यात चिनी पावडरची भेसळ? काय आहे प्रकरण?
सोन्याच्या दरातील घसरणीबरोबरच सध्या सोन्याच्या शुद्धतेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. चिनी बनावटीच्या रेनियम पावडरचा वापर करून सोन्याचे वजन वाढवले जात असल्याचे दावे केले जात आहेत. या पावडरचा वापर सोन्याच्या दागिन्यांमध्ये किंवा मिश्रधातूंमध्ये केला जात असल्याच्या चर्चेमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
काही दाव्यांनुसार, रेनियम पावडरच्या विशिष्ट प्रकारांची किंमत १०० ग्रॅमसाठी सुमारे ३ हजार ते ३ हजार ४०० डॉलर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या पावडरचा सोन्याच्या शुद्धतेवर, कॅरेटवर आणि दागिन्यांच्या गुणवत्तेवर नेमका काय परिणाम होतो, याबाबत अधिकृत तांत्रिक तपासणी आणि विश्वसनीय माहिती महत्त्वाची आहे. त्यामुळे केवळ चर्चांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सोन्याची खरेदी करताना हॉलमार्क, बीआयएस चिन्ह आणि एचयूआयडी क्रमांक तपासणे आवश्यक आहे.

Maharashtra Mirror




